गर्भधारणा रोखणार्‍या अँटिबॉडीची निर्मिती | पुढारी

गर्भधारणा रोखणार्‍या अँटिबॉडीची निर्मिती

वॉशिंग्टन : अमेरिकेतील वैज्ञानिकांनी अशा अँटिबॉडीज (प्रतिजैविके) तयार केल्या आहेत ज्या गर्भनिरोधक औषधाचे काम करतील. हा गर्भधारणा रोखण्याचा ‘नॉन-हार्मोनल’ मार्ग आहे. याचा अर्थ अँटिबॉडीजच्या मदतीने गर्भधारणा रोखली जाईल आणि त्याचा परिणाम शरीरातील हार्मोन्सवरही होणार नाही.

नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या अँटिबॉडीज विकसित केल्या आहेत. त्यांनी सांगितले की ही महिलांसाठी नव्या प्रकारची ‘कॉन्ट्रासेप्टिव्ह’ आहे जी त्यांना गर्भनिरोधक औषधांमुळे होणार्‍या साईड इफेक्टस्पासूनही वाचवेल.

संशोधकांनी अशा अँटिबॉडीजची चाचणी आधी मेंढ्यांवर केली. या मेंढ्यांना अँटिबॉडीजचा 333 मायक्रोग्रॅमचा हाय डोस देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या शरीरातील नैसर्गिक अँटिबॉडीज आणि नव्या अँटिबॉडीजनी सर्व शुक्राणूंना बीजांडापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखले. दुसर्‍या चाचणीत संशोधकांनी मेंढ्यांना अँटिबॉडीजचा 33.3 मायक्रोग्रॅमचा लो-डोस दिला.

हा डोस दिल्यानंतर शुक्राणूंना रोखण्यात 97 ते 99 टक्के यश मिळाले. या अँटिबॉडीज शुक्राणूंना इतके कमजोर बनवतात की ते बीजांडापर्यंत पोहोचू शकत नाही. प्राण्यांमध्ये या अँटिबॉडी शुक्राणूंना रोखण्यात 99.9 टक्के यशस्वी झाल्या.

संशोधक सॅम्युअल लाई यांनी सांगितले की गर्भनिरोधक औषधे घेतल्यानंतर अनेक महिलांना डोकेदुखी, वजन वाढणे, डिप्रेशन आणि रक्तस्त्रावासारखे काही साईड इफेक्टस् होतात. त्यामुळे अनेक महिला अशी औषधे घेणे टाळतात. अशा साईड इफेक्टस्चा धोका टाळण्यासाठी नव्या आणि नॉन-हार्मोनल गर्भनिरोधक पर्यायांची गरज होती. आता ती अशा अँटिबॉडीजमुळे पूर्ण झाली आहे.

Back to top button