सूर्याला ‘झोप’ लागली तर? | पुढारी

सूर्याला ‘झोप’ लागली तर?

नवी दिल्ली : आपल्या सौरमालिकेतील तारा म्हणजेच सूर्यापासूनच प्रकाश व ऊर्जा मिळत असते. अब्जावधी वर्षांपासून हा तारा सक्रिय आहे. मात्र, त्यालाही कधी तरी ‘डुलकी’ लागू शकते. गेल्या आठवड्यात सूर्याने तीन सोलर फ्लेअर्स उत्सर्जित केले होते. तसेच 18 कोरोनल मास इजेक्शन आणि एक जिओमॅग्नेटिक वादळही निर्माण केले होते. मात्र, नेहमीच असे होते असं नाही. अनेकवेळा असे देखील दिसून आले आहे की सूर्याच्या पृष्ठभागावरील सर्व डाग पूर्णपणे नाहीसे होतात आणि त्यानंतर जणू काही सूर्य निद्रित अवस्थेत असल्यासारखा वाटतो!

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर) च्या संशोधकांनी सूर्यावरील क्रिया संपल्यावर काय होते याबाबतची माहिती दिली आहे. तारा स्वतःचा विस्फोट होण्यासाठी पुन्हा ऊर्जा कशी मिळवतो आणि कशाप्रकारे विस्फोटानंतर तार्‍याच्या धोकादायक ज्वाळा बाहेर नुकसान पोहोचवतात याबद्दलची माहिती दिली आहे. या संशोधनाविषयीचा लेख रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिकात प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनात असे म्हटले आहे की तारा झोपलेला असला तरी त्याच्या ध्रुवीय ठिकाणी आणि तार्‍याच्या आत सतत हालचाल होत असते.

सूर्याची अंतर्गत डायनॅमो यंत्रणा, जी आपल्या सौरमालेचे चक्र राखते, तार्‍याच्या शांत कालावधीत क्वचितच कार्य करते. सूर्यावर अशीही वेळ आली आहे ज्यावेळी त्याची क्रिया सर्वात मंद झाली होती आणि त्यावेळी सूर्यावर एकही डाग नव्हता. हा काळ ‘ग्रँड मिनिमम’ म्हणून ओळखला जातो. या दरम्यान सूर्यामध्ये सोलर रेडिएशन आणि पर्टिक्युलेट आऊटपूट कमी होते, जे ग्रँड मिनिमम कालावधीचे वैशिष्ट आहे. सन 1645 ते 1715 या कालावधीत सूर्यावर फारच कमी डाग होते. सूर्याचे वय 4.6 अब्ज वर्षे इतके आहे.

Back to top button