शिर नसलेल्या सांगाड्यांची हजारो वर्षांपूर्वीची दफनभूमी | पुढारी

शिर नसलेल्या सांगाड्यांची हजारो वर्षांपूर्वीची दफनभूमी

लंडन : मध्य युरोपमध्ये संशोधकांना हजारो वर्षांपूर्वीची एक दफनभूमी सापडली आहे. तेथील सांगाड्यांनी संशोधकांना भयचकीत केले. याचे कारण म्हणजे इथे दफन झालेल्या एकाही मनुष्याच्या देहावर डोके नाही. मध्य युरोपातील ही सर्वात मोठी निओलिथिक वसाहत आहे. स्लोव्हाकियातील एका गावात स्लोव्हाक आणि जर्मन पुरातत्त्व संशोधकांनी ती उत्खननात शोधून काढली.

पश्चिम स्लोव्हाकियातील व्रॅबल टाऊनमध्ये ही हजारो वर्षांपूर्वीची दफनभूमी सापडली. याठिकाणी 36 लोकांचे शिर नसलेले सांगाडे सापडले आहेत. इसवी सन पूर्व 5250 ते इसवी सन पूर्व 4950 या काळातील हे लोक आहेत. या सर्वांचा बळी देण्यात आला असावा असे संशोधकांना वाटते. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या उत्खनन आणि भूभौतिकीय सर्वेक्षणात या 120 एकरांत पसरलेल्या वसाहतीत आतापर्यंत 300 मोठी घरेही सापडली आहेत. त्यापैकी 50 ते 70 घरे अशी होती जी त्या काळात वापरात होती. दर तीनपैकी एका वसाहतीमध्ये सुरक्षेसाठी एक दरी आणि लागवडीच्या शेवटच्या टप्प्यात कुंपण घालण्याची व्यवस्था होती. वस्तीत जाण्यासाठी सहा मार्ग असून ते सुरक्षेसाठी बनवलेल्या दरीतून जात असत.

पूर्वीच्या उत्खननात तिथे अनेक थडगीही सापडली होती. उत्खननात पुरातत्त्व संशोधकांना वस्तीत जाण्याच्या मार्गाजवळील खड्ड्यातून सुमारे 36 लोकांचे अवशेष सापडले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही सांगाड्याचं डोकं नाही, फक्त त्यांचे हात व पायच आहेत. यामध्ये केवळ पुरुषच नसून स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या ठिकाणी केवळ एकाच अशा लहान मुलाचा सांगाडा आहे ज्याची कवटी आणि जबडा आहे.

Back to top button