आत्महत्येचा विचार येताच लागणार छडा! | पुढारी

आत्महत्येचा विचार येताच लागणार छडा!

न्यूयॉर्क : अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या मनोविज्ञान विभागाने आत्महत्येच्या प्रवृत्तीला जाणण्यासाठी एक नवी पद्धत शोधली आहे. काही स्वयंसेवकांवर त्यांनी याबाबतचे प्रयोगही सुरू केले आहेत. आत्महत्येचा विचार मनात येताच त्याचा वेळीच छडा लागू शकेल, असे संशोधकांना वाटते.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक बायोसेन्सर डेटाच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत की एखाद्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये आत्महत्या करण्याचा विचार कधी व कोणत्याही परिस्थितीत येतो. त्यासाठी त्यांनी काही निवडक लोकांच्या स्मार्टफोनमध्ये काही अ‍ॅप्स इन्स्टॉल केले आहेत आणि त्यांच्या हातावर डिजिटल बँड बांधला आहे. त्याच्या सहाय्याने या लोकांच्या दिवसभराच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. केटलिन क्रूज नावाच्या एका तरुणीलाही यामध्ये सहभागी केले आहे.

केटलिन काही दिवसांपूर्वीच मनोवैज्ञानिकांकडून उपचार घेऊन घरी गेली आहे. आता मनोवैज्ञानिक जीपीएसच्या माध्यमातून ती घरातून बाहेर पडते की नाही याविषयी ट्रॅक करीत आहेत. जर ती बाहेर पडत असेल तर किती वेळ बाहेर जाते, तिचा पल्स रेट किती असतो, या काळात तो वाढतो की घटतो, ती किती वेळ झोप घेतेे, रात्री किती वेळा तिची झोपमोड होते यावर लक्ष ठेवले जाईल.

संशोधक मॅथ्यू नॉक यांनी सांगितले की या सर्व गोष्टींची तपासणी केली जाईल व यामधून आम्हाला हे जाणून घेण्यास मदत मिळेल की संबंधित व्यक्ती आत्महत्येचा विचार करीत आहे का. जर संबंधित व्यक्तीची झोप वारंवार मोडत असेल तर तिचा मूड ठीक नाही असा अर्थ होतो. जर ‘जीपीएस’मधून दिसले की व्यक्ती वारंवार घरात फेर्‍या मारत आहे, त्यावरून असे दिसते की ही व्यक्ती रागात आहे. अशाप्रकारे सेन्सर रिपोर्ट बनतो ज्यामधून व्यक्ती त्रस्त आहे की नाही हे समजते. त्यामुळे संबंधित व्यक्ती टोकाचे पाऊल उचलण्यापासून त्याला वेळीच सावरता येते.

Back to top button