‘या’ देशातील लोक चक्क परदेशातून मागवतात पिझ्झा! | पुढारी

‘या’ देशातील लोक चक्क परदेशातून मागवतात पिझ्झा!

लंडन : सध्याच्या काळात ऑनलाईन फूड डिलिव्हरीमुळे लोकांना घरबसल्या हवे ते पदार्थ मागवून घेता येतात. कुणीही घरी बसूनच आपल्या आवडीच्या रेस्टॉरंटमधील जेवण ऑर्डर करून खाऊ शकतात. मात्र, कुणी परदेशातूनही आवडीचे पदार्थ मागवून घेत असतील असे आपल्याला वाटणार नाही. नायजेरियात असा प्रकार दिसून येतो. तेथील लोक आपल्या देशाऐवजी चक्क इंग्लंडमधून पिझ्झा मागवत आहेत.

ही माहिती खुद्द नायजेरियाच्या कृषी मंत्र्यांनीच दिलेली आहे. कृषिमंत्री औदू ओग्बेह यांच्या म्हणण्यानुसार नायजेरियन लोक आपली श्रीमंती व ‘स्टेटस’ दाखवण्यासाठी परदेशातून पिझ्झा मागवत आहेत. ही ऑर्डर त्यांच्या घरी विमानाने पाठवली जाते. परदेशातून पिझ्झा मागवण्याचा छंद इतरांनाही चकीत करीत आहे. लोक रात्री हा पिझ्झा ऑर्डर करतात. त्यानंतर हा पिझ्झा बनवून चांगला पॅक केला जातो.

तो ब्रिटिश एअरवेजने नायजेरियाला पाठवला जातो. सकाळी विमानतळावर आल्यानंतर पत्त्यानुसार त्याची रवानगी केली जाते. केवळ हौसेपोटी लोक 6440 किलोमीटर अंतरावरून पिझ्झा मागवत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटते. अशा शौकिनांच्या हौसेमुळे स्थानिक विक्रेत्यांना मात्र मोठाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा ऑर्डर्सना आळा घालण्याची मागणी अनेकांनी सरकारकडे केली आहे.

Back to top button