शाकाहारात भारत ‘नंबर वन’ | पुढारी

शाकाहारात भारत ‘नंबर वन’

नवी दिल्ली : जगात अब्जावधी जीव आहेत. खाण्यावरून या जीवांची वर्गवारी करावयाची झाल्यास एक ‘शाकाहारी’ आणि दुसरे ‘मांसाहारी’. माणूसही यातून सुटू शकत नाही. कारण जगातील तमाम लोकांचीही शाकाहारी व मांसाहारी अशी वर्गवारी करता येईल. काही देशांमध्ये शाकाहार तर काही देशांमध्ये मांसाहारास प्राधान्य दिले जाते. मात्र, जगात तमाम देशांमध्ये या दोन्ही प्रकाराच्या आहाराला पसंती मिळते.

भारतातही मोठ्या प्रमाणात मांसाहारी आहेत. उल्लेखनीय म्हणजे शाकाहारींमध्ये भारत जगातच अव्वल स्थानी आहे. म्हणजेच जगात शाकाहारी लोकांच्या यादीत भारत पहिल्या स्थानी आहे. संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगातील ‘टॉप 10’ शाकाहारी देशांमध्ये भारत अव्वल तर मेक्सिको दुसर्‍या स्थानावर आहे. या अहवालातील माहितीनुसार भारतातील सुमारे 42 टक्के लोक शाकाहारी आहेत. त्यानंतर मेक्सिको (19 टक्के), ब्राझील (14), तैवान (14) स्वित्झर्लंड (13), इस्त्राईल (10.3), न्यूझीलंड (10 टक्के) जर्मनी (10), स्वीडन (10) तर कॅनडामध्ये 9.4 टक्के लोक शाकाहारी आहेत.

भारताचा विचार केल्यास हरियाणा व राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात शाकाहारी आहेत. हरियाणामध्ये 56 टक्के महिला व पुरुष शाकाहारी आहेत. त्यानंतर छत्तीसगड, हिमाचल प्रदेशचा क्रमांक लागतो. असे असले तरी मांसाहार खाण्यात भारतात पुरुषाबरोबरच महिला जराही पिछाडीवर नाहीत. चारपैकी 3 महिलांना मांसाहार आवडतो. तर मांसाहार खाण्यामध्ये प. बंगाल, झारखंड, ओडिसा, बिहार ही राज्ये आघाडीवर आहेत.

Back to top button