वॉशिंग्टन : 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात', अशी एक भारतात म्हण प्रचलित असून ती अमेरिकेत खरी म्हटल्यास चुकीचे ठरू नये. तेथील एका मुलाने वयाच्या चौथ्या वर्षी पेंटिंग्ज रंगवण्यास सुरुवात केली. त्याने यासाठी इंटरनेट आणि मोठ्या कलाकारांना फॉलो केले आणि दहाव्या वर्षी त्याचे पेटिंग्ज आता कोट्यवधी रुपयांना विकले जात आहेत.
अमेरिकेत राहणार्या आंद्रेस वेलेंसिया याला लहानपणापासून पेंटिंग्जची आवड होती. त्यास आई-वडिलांकडून चांगला पाठिंबा मिळाला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच त्याचे पेंटिंग्ज मोठमोठ्या गॅलरिजमध्ये लावली जात आहेत.
फोर्थ ग्रेडमध्ये शिकणार्या आंद्रेसच्या पेंटिंग्जला लिटल पिकासोचे नाव दिले जात आहे. मोठमोठ्या प्रदशर्नांमध्ये त्याची पेंटिंग्ज ठेवली आणि विकली जात आहेत. लोकांना ती फारच आवडत आहेत. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार आंद्रेसचे एक पेंटिंग हाँगकाँमधील फिलीप डे प्युरीमध्ये तब्बल 1.3 कोटी रुपयांना विकले गेले.
त्याची अनेक पेंटिंग्ज कोट्यवधीच्या भावाने विकली गेली आहेत. त्याने आपल्या कमाईतून दोन कोटी रुपये एड्स ट्रस्टला दानही केले आहे. लहानपणीच मोठा कलाकार बनलेल्या आंद्रेसवर जगप्रसिद्ध द मियामी हेरॉल्ड, द न्यूयॉर्क पोस्ट, द टाईम्स ऑफ लंडनमध्ये लेख प्रसिद्ध झाले आहेत.