वॉशिंग्टन : स्वच्छ ऊर्जा व पर्यावरणाचे रक्षण या हेतूने आता जगभर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक कार, बाईक, ऑटो, बसेसची निर्मिती केली जात आहे. आता यामध्ये इलेक्ट्रिक विमानाचीही भर पडली आहे. जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाने आता यशस्वी उड्डाणही केले आहे. 'अॅलिस' नावाच्या या विमानाची चाचणी यशस्वी झाली आहे.
अमेरिकेत वॉशिंग्टनमधील ग्रँट काऊंटी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अॅलिस विमानाने यशस्वी उड्डाण केले आणि सुमारे आठ मिनिटे ते आकाशात उडत होते. त्यानंतर त्याने अगदी सहजपणे जमिनीवर लँडिंग केले. या विमानाने यशस्वी उड्डाण केल्यानंतर एक इतिहास रचला गेला आहे. हा इतिहास इस्रायलची कंपनी 'एव्हिएशन एअरक्राफ्ट'ने रचला. या विमानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि विमानाचे रूपडेही सुंदर आहे. 'अॅलिस'चा वेग ताशी 480 किलोमीटर इतका आहे. त्यामधून नऊ लोक प्रवास करू शकतात.
एकदा चार्ज केल्यावर ते 250 नॉटिकल माईल्स म्हणजेच सुमारे 400 किलोमीटरचे अंतर सहज पार करू शकते. हे विमान दोन तास सहज उडवता येते. ते सुमारे 1100 किलो वजनासह उड्डाण करू शकते. पहिल्याच उड्डाणामध्ये विमानाने आकाशात 3500 फूट उंची गाठली आणि यादरम्यान अनेक महत्त्वाचा डेटाही गोळा करण्यात आला. या डेटाच्या मदतीने हे विमान अधिक चांगले कसे करता येईल हे समजू शकेल. या यशस्वी उड्डाणाने इतिहास रचल्याचे एव्हिएशन एअरक्राफ्टचे अध्यक्ष व सीईओ ग्रेगरी डेव्हिस यांनी म्हटले आहे.