आता आवाजावरून ओळखणार आजार! | पुढारी

आता आवाजावरून ओळखणार आजार!

न्यूयॉर्क : आजाराचे निदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या तसेच उपकरणेही अस्तित्वात आहेत. मात्र, आवाजावरूनही एखाद्या आजाराचे निदान करता येऊ शकेल असे आपल्याला वाटणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आता हे सुद्धा शक्य होणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातही उच्च तंत्रज्ञानाचा वापर चांगल्याप्रकारे होत आहे. आता आवाजावरून आजार ओळखण्याच्या तंत्रज्ञानावर संशोधक काम करीत आहेत. यासाठी संशोधक एक डेटाबेस तयार करीत आहेत. त्याचा उपयोग मानवी आवाज ऐकून आजार शोधण्यासाठी केला जाईल. अल्झायमर्सपासून कर्करोगापर्यंतच्या अनेक आजारांच्या निदानासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

याबाबत काम करणार्‍या संस्थेच्या म्हणण्यानुसार, ज्याप्रमाणे रक्त किंवा अन्य वैद्यकीय चाचण्यांच्या मदतीने आजाराचे निदान केले जाते, त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णाचा आजार शोधला जाईल. संशोधक ऑलिवियर एलिमेंटो यांनी सांगितले की एखाद्या रुग्णाचा व्हॉईस डेटा हा सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा डेटा आहे. शिवाय कोणत्याही रुग्णाची माहिती गोळा करण्याचा हा सर्वात सुलभ मार्ग आहे.

या तंत्रज्ञानासाठी आवाजाची माहिती गोळा करण्याचा सर्वोत्तम मार्ग अजून सापडलेला नाही असे संशोधक येल बेन्सॉसन यांनी सांगितले. या तंत्रज्ञानामध्ये आवाजाचे डेटाबेस तयार करण्यात येईल. याकरिता संशोधकांनी एक नवे अ‍ॅप विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्याद्वारे रुग्णाच्या आवाजाचे नमुने गोळा करण्यात येतील. आवाजाद्वारे आजाराचे निदान करताना रुग्णाला अ‍ॅपवरील काही ओळी वाचून दाखवाव्या लागतील. त्या आवाजाच्या सहाय्याने आजाराचे निदान होईल.

Back to top button