न्यूयॉर्क : बाळाला जन्म दिल्यानंतर आईमध्ये मोठे शारीरिक व मानसिक बदल घडत असतात. मात्र, पित्यामध्ये असे काही बदल घडतात की नाही याबाबत साशंकता होती. सर्वसाधारणपणे वरकरणी पुरुषांमध्ये वडील बनल्यावर कोणताही बदल झाल्याचे दिसत नाही. मात्र, हे खरे नसल्याचे आता संशोधकांनी म्हटले आहे. एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की पहिल्यांदा बाप बनल्यानंतर पुरुषांमध्येही मोठे मानसिक बदल होतात. त्यांचा मेंदू आकसतो, ते आपल्या व कुटुंबाच्या बाबतीत अधिक विचार करू लागतात. त्यांचे मन भटकत राहते आणि ते अनेक स्वप्नं पाहू लागतात!
अर्थात बाप बनल्यानंतर होणारे पुरुषांमधील बदल हे महिलांच्या तुलनेत बरेच कमी आहेत. 'सेरिब्रल कॉर्टेक्स'मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ग्रेगोरिया मारान हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मॅग्दालेन मार्टिनेज गार्सिया यांनी सांगितले की पिता बनण्याच्या एक वर्ष आधी व पिता बनल्यानंतर पुरुषांची एमआरआय चाचणी करण्यात आली. त्यामधून दिसून आले की अपत्य झाल्यानंतर पुरुषांचा मेंदू हळूहळू आकुंचित होऊ लागतो. त्यामुळे मेंदूच्या काही भागात दबाव पडतो. सर्वाधिक दबाव हा मेंदूच्या मागील भाग असलेल्या कॉर्टेक्सवर पडतो. याठिकाणी रेटिनाच्या माध्यमातून सूचना पोहोचतात आणि या सूचना माहितीत परिवर्तित होतात.
पुरुषांमधील या बदलामुळे बाळाबाबत त्यांची ओढ वाढते. मानसिकद़ृष्ट्या या बदलाचा पॅटर्न आईमधील बदलासारखाच असला तरी त्याचा वेग तुलनात्मक द़ृष्टीने अतिशय कमी असतो. पहिल्यांदा पिता बनण्याच्या तुलनेत दुसर्यांदा पिता बनत असताना हा बदल अधिक वेगाने घडतो असेही आढळून आले आहे.