अंतराळाच्या शून्य गुरुत्वाकर्षणातही योगासने! | पुढारी

अंतराळाच्या शून्य गुरुत्वाकर्षणातही योगासने!

वॉशिंग्टन : प्राचीन भारतीय संस्कृतीने जगाला अनेक अनमोल देणग्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये तत्त्वज्ञान, गणितातील मूलभूत सिद्धांत, खगोलशास्त्रातील महत्त्वाची माहिती यापासून आयुर्वेद व योगविद्येपर्यंत अनेक देणग्यांचा समावेश होतो. आता तर योगविद्येचा स्वीकार संपूर्ण जगानेच केलेला पाहायला मिळतो. पृथ्वीच्या पाठीवर योगासने करणारे लोक पाहायला मिळतातच; पण आता अंतराळातही योगासने केली जात आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर शून्य गुरुत्वाकर्षणात योगासने करीत असलेल्या एका अंतराळ वीरांगनाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीतील अंतराळवीर समंथा क्रिस्टोफोरेटी ही शून्य गुरुत्वाकर्षणात काही योगासने करीत असताना या व्हिडीओतून दिसून येते. समंथा या व्हिडीओमध्ये प्रशिक्षकांसह ऑनलाईन वर्गात योगविद्येचे धडे घेत होती. शून्य गुरुत्वाकर्षणात योगासने करणे कठीण असते. मात्र, योग्य प्रशिक्षण असेल तर काहीच अशक्य नाही, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

अनेक लोकांना नियमितपणे व्यायाम किंवा योगासने करण्याचा कंटाळा येतो. मात्र, ही महिला अंतराळ स्थानकातही योगासने करीत आहे. हे पाहून आम्ही प्रेरित झालो असल्याची प्रतिक्रिया यूजर्सनी दिली आहे. अंतराळ स्थानकातील दीर्घ मुक्कामात आपले शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवणे हे एक आव्हानच असते. अशावेळी ध्यान व योगासनांचा चांगला उपयोग होत असतो.

Back to top button