अनुमानापेक्षा आधीच झाली होती वनस्पतींची निर्मिती | पुढारी

अनुमानापेक्षा आधीच झाली होती वनस्पतींची निर्मिती

न्यूयॉर्क : पृथ्वीवर वनस्पतींची निर्मिती सध्याच्या अनुमानापेक्षा आधीच झाली होती असे आता आढळून आले आहे. जगातील सर्वात प्राचीन व त्रिमितीय स्वरूपात जतन झालेल्या हिरव्या शैवालाच्या जीवाश्मावरून हे दिसून आले आहे. 54,10,00,000 वर्षांपूर्वीचे हे शैवाल आहे.

हे शैवाल 63 कोटी 50 लाख ते 54 कोटी 10 लाख वर्षांदरम्यानच्या एडियाकॅरेन युगातील असल्याचे मानले जाते. याच काळात ‘कॅम्ब्रियन काळ’ही समाविष्ट आहे. हा काळ 541 दशलक्ष ते 485 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. त्या काळात जीवसृष्टीने अचानक वैविध्य धारण केले. या घटनेला ‘कॅम्ब्रियन एक्सप्लोजन’ असे म्हटले जाते.

त्या काळातील हे जीवाश्म असून ते सूक्ष्म म्हणजे केवळ अर्धा मिलीमीटर व्यासाचे आहे. मात्र, ते अत्यंत चांगल्या प्रकारे जतन झालेले आहे. त्यामधील तंतूही स्पष्टपणे दिसून येतात. मध्य चीनमधील शांक्सी प्रांतात हे जीवाश्म सापडले. एडियाकॅरेन काळात याठिकाणी उथळ समुद्र होता असे मानले जाते. सुमारे एक अब्ज वर्षांपूर्वी वनस्पतींचे जे कुळ उदयास आले त्याचा हिरवे शैवाल हा एक हिस्सा होता, असे मानले जात होते.

मात्र, आता नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की वनस्पतींचा उदय त्यापूर्वीच म्हणजे 100 दशलक्ष वर्षांपूर्वी झाला असावा. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘बीएमसी बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे प्राचीन शैवाल आश्चर्यकारकरीत्या गुंतागुंतीच्या रचनेचे असून ते आधुनिक काळातील ‘कोडियम’ या सागरी शैवालासारखे आहे.

Back to top button