जपानमध्ये धावणार ‘डोळे’ असलेल्या मोटारी! | पुढारी

जपानमध्ये धावणार ‘डोळे’ असलेल्या मोटारी!

टोकियो : जपानमध्ये मोटारींबाबत एक अनोखा प्रयोग केला जात आहे. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी मोटारींच्या पुढील बाजूस मोठे मोठे डोळे लावले जातील. हे कृत्रिम डोळे जपानच्या स्वयंचलित मोटारींवर लावले जातील. विशेष म्हणजे हे डोळे डावीकडे व उजवीकडे फिरू शकतात. ज्यावेळी अशा मोटारी रस्त्यावर धावत असतील त्यावेळी पायी चालत असलेले लोक त्यांना पाहून सावध होतील. त्यामुळे पादचार्‍यांना मोटारींची धडक होण्याचे प्रमाण कमी होईल. हे डोळे असूनही एखादा माणूस गाडीसमोर आला तरी ही कार आपोआप थांबू शकते.

रोड अ‍ॅक्सिडंट रोखण्यासाठी जपानमध्ये नव्या तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. मोटारींवर लावलेले हे डोळे जर कोणत्याही दिशेने पाहत नसतील तर पादचारी लोकांसाठी ही मोटार धोकादायक आहे असे समजले जाईल. त्यामुळे अशावेळी पायी चालणार्‍या लोकांनी या मोटारीसमोरून रस्ता ओलांडू नये. अशा ‘गेझिंग कार’ मुळे (पाहणार्‍या मोटारी) पादचारी लोकांचा अपघात होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. अभियंत्यांनी प्रयोग म्हणून गोल्फ बग्गीवर नकली डोळे बसवले. हे डोळे डावीकडे-उजवीकडे फिरत होते आणि त्यांना संशोधक नियंत्रित करीत होते. भविष्यात हेच तंत्र सेल्फ ड्रायव्हिंग कारसाठी वापरले जाईल. या स्वयंचलित किंवा चालकरहीत मोटारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नियंत्रित होतात.

Back to top button