महासरोवराच्या खाली वाढली भूगर्भीय हालचाल | पुढारी

महासरोवराच्या खाली वाढली भूगर्भीय हालचाल

वेलिंग्टन : न्यूझीलंडमधील सर्वात मोठ्या सरोवराचे नाव ‘लेक ताऊपो’ असे आहे. या सरोवराखाली जगातील सर्वात मोठा स्फोट करू शकणारा ज्वालामुखी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांनी तेथील जमीन थरथरत आहे. ही थरथर कमी होत नसल्याने शास्त्रज्ञांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन अलर्ट लेवल वाढविला आहे. खरे तर या ज्वालामुखीचा उद्रेक 1800 वर्षांपूर्वी झाला होता आणि तो पृथ्वीच्या गेल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा होता.

जियोलॉजिकल एजन्सी ‘जिओनेट’ने दिलेल्या माहितीनुसार लेक ताऊपो सरोवराखाली गेल्या काही दिवसांत सातशेहून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे सरोवर ज्वालामुखीजवळच आहे. ज्वालामुखीबाबत सात अलर्ट लेवल असतात. पहिला शून्य म्हणजे शांत आणि नंतरचे सहा म्हणजे अत्यंत धोकादायक. सध्या तरी लेक ताऊपोच्या खालील ज्वालामुखीला लेवल 2 चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही लेवलवर ज्वालामुखीचा ऊद्रेक होऊ शकतो.

एका अंदाजानुसार लेक ताऊपोखाली असलेल्या ओरूआनुई ज्वालामुखीचा इ.स. पूर्व 200 च्या आसपास उद्रेक झाला होता. यामुळे न्यूझीलंडच्या मध्य व उत्तर द्विपावर प्रचंड नुकसान झाले होते. यामध्ये 100 क्यूबिक किमी राख वातावरणात पसरली होती. आता याच ज्वालामुखीची हळूहळू हालचाल वाढू लागली आहे. गेल्या 12 हजार वर्षांत हा ज्वालामुखी 25 वेळा सक्रिय झाला आहे.

Back to top button