बेडकांची संख्या घटल्याने वाढले मलेरियासारखे आजार | पुढारी

बेडकांची संख्या घटल्याने वाढले मलेरियासारखे आजार

नवी दिल्ली : मानवी आरोग्यावर आजपर्यंत करण्यात आलेल्या अनेक संशोधनात असे आढळले आहे की, जगात जेव्हा एखाद्या भागात बेडकासारख्या उभयचरांच्या संख्येत प्रचंड घट झाली, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून त्या भागात मलेरियासारखे घातक आजार बळावले.

मध्य अमेरिकेत यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातून वरील निष्कर्ष काढण्यात आला. तसे पाहिल्यास मानवी आरोग्याला अनेक कारणे प्रभावित करत असतात. सध्या जगभरात लुप्त होत असलेल्या जीवांच्या संवर्धनासाठी अनेक पावले उचलली आहेत. मात्र, यामध्ये उभयचरांचाही समावेश करण्याची गरज आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनात बेडूक आणि मलेरिया यासारखे घातक आजार यांच्यात असलेल्या संबंधावर प्रकाश टाकण्यात आला.

1980 च्या दशकात मध्य अमेरिकन देश कोस्टा रिका व पनामात संशोधकांना उभयचरांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे आढळून आले. या भागातील बेडूक, सॅलेंडर व अन्य उभयचर हे एका विषाणूची शिकार बनत होते. ‘बॅट्राकोकिट्रियम डेंड्रोबाटिडिस’असे विषाणूचे नाव. या विषाणूने जैवविविधतेवर एकप्रकारे आघातच केला होता.

खरे तर बेडूक आणि सॅलेंडर या उभयचरांचे डास हेच मुख्य खाद्य असते. पण याच उभयचरांची संख्या विषाणूमुळे घटली आणि त्यामुळे डासांची संख्याही प्रचंड वाढली. याचा परिणाम म्हणून कोस्टारिका व पनामा भागात मलेरियासारख्या घातक आजारांचा प्रभाव वाढला होता. यामुळे उभयचरांचे अस्तित्व हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.

Back to top button