रात्रीच्या कृत्रिम प्रकाशाने वाढतात अनेक आजार

लंडन : अमेरिका आणि युरोपमध्ये कृत्रिम प्रकाशामुळे रात्री इतक्या चमकदार झाल्या आहेत की, त्यामुळे आरोग्यासंबंधीच्या समस्या वाढू लागल्या आहेत. यासंदर्भातील संशोधनानुसार रात्रीचा अंधार हा केवळ निसर्गासाठीच आवश्यक आहे, असे नसून तो माणसाच्या झोप आणि आरोग्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. तसेच जी झाडे रस्त्यावरच्या वीज खांबांजवळ असतात ती अन्य झाडांच्या तुलनेत कमी फुले आणि फळे देत असतात.
‘डॅश वॅले’च्या अहवालानुसार पर्यावरणाच्या भल्यासाठी रात्रीच्या सुमारास अंधार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच रात्रीच्या पुरेशा अंधारात झोपल्यास ते मानवी आरोग्यासाठी हितकारक ठरते. मात्र, कृत्रिम प्रकाशामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. यामध्ये डोळ्यांच्या समस्या, कमी झोप, लठ्ठपणा आणि अनेक प्रकारचे नैराश्य येण्याचा धोका वाढतो. गडद अंधारात ज्यावेळी झोपतो त्यावेळी झोपेचा दर्जाही चांगला असतो. याचा सकारात्मक परिणाम थेट आरोग्यावर होत असतो.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड वेलफेयर फिनलँड’चे संशोधक टिमो पार्टोनन यांनी आपल्या अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार सध्या लोक जेमतेम 6 ते 9 तास झोपत आहेत. मात्र, या लोकांना जर चांगली झोप पाहिजे असेल तर त्यांनी गडद अंधारात झोपणे आवश्यक आहे. चांगल्या व पुरेशा झोपेने उच्च रक्तदाब, लठ्ठपणा नियंत्रणात राहतो. तसेच स्मरणशक्ती चांगली बनते. मधुमेहाचा धोकाही काही प्रमाणात कमी होतो.