पंधरा दिवसांत ‘त्याला’ आठवेळा सर्पदंश! | पुढारी

पंधरा दिवसांत ‘त्याला’ आठवेळा सर्पदंश!

आग्रा : काही काही घटना अशा असतात की त्या पाहून लोकांची मती गुंग होऊन जाते. असाच प्रकार उत्तर प्रदेशात आग्रा येथे घडला आहे. तेथील रजत चाहर नावाच्या वीस वर्षांच्या तरुणाला गेल्या पंधरा दिवसांत तब्बल आठवेळा सर्पदंश झाला. यामुळे हा तरुण अर्थातच दहशतीखाली आहे.

पहिल्यांदा ही घटना रात्रीच्या वेळी घडली. त्यावेळी तो आपल्या घरात झोपला असताना त्याच्या पायाला सापाने दंश केला. टोकदार वस्तू टोचल्यासारखे जाणवल्याने तो उठला त्यावेळी त्याला बाजूने साप जात असताना दिसला. त्याच्या पायातून रक्तही येत होते. त्याने ओरडून कुटुंबीयांना जागे केले व त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र, हा प्रकार इथेच थांबला नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर दर दोन ते तीन दिवसांनी साप येऊन त्याला दंश करतो. अशा प्रकारे पंधरा दिवसांत त्याला एकूण आठवेळा साप चावला. हा साप कुठून येतो व कुठे जातो याचा शोध घेऊनही त्याचा सुगावा लागला नाही. त्यामुळे हा तरुण सध्या भीतीच्या छायेत वावरत आहे.

संबंधित बातम्या
Back to top button