

न्यूयॉर्क : 'सौरवादळ' म्हणजे सूर्यापासून बाहेर पडणारा 'कोरोनल मास'. हे एक अत्यंत धोकादायक व नुकसानदायी असते. शास्त्रज्ञांनी याबाबत नुकताच एक इशारा दिला आहे. यामध्ये भविष्यात असे सौरवादळ येईल की, ज्यामुळे पृथ्वीवर 'इंटरनेट प्रलय' येईल. म्हणजे पृथ्वीवरील संपूर्ण इंटरनेट सेवा एक तर बंद पडेल अथवा अनेक दिवसांसाठी बाधित होऊ शकते.
'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'ची संशोधक संगीता अब्दू ज्योती यांनी सौरवादळासंबंधीचे संशोधन नुकत्याच झालेल्या 'सिगकीम 2021 डेटा कम्युनिकेशन कॉन्फरन्स'मध्ये सादर केले.
संगीता यांच्या संशोधनानुसार भविष्यात या संभाव्य सौरवादळामुळे स्थानिक पातळीवरील इंटरनेट सेवेवर याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण ते प्रामुख्याने फायबर ऑप्टिक्सवर चालत असतात. या फायबर ऑप्टिक्सवर जियोमॅग्नेटिक करंटचा थेट परिणाम होत नाही.
मात्र, जगभरातील समुद्रात पसरलेल्या इंटरनेट केबलवर सौर वादळाचा परिणाम होऊ शकतो. संगीता यांच्या मते, आजपर्यंत सौरवादळाबद्दल आपल्याला अत्यंत कमी माहिती आहे. याशिवाय याचा पुरेसा डाटाही उपलब्ध नाही. मात्र, ज्यावेळी सौर वादळे येतात, तेव्हा इलेक्ट्रिक ग्रिडसचे मोठे नुकसान होते. यामुळे मोठ्या परिसरात अंधार होतो.
याबरोबरच याचा परिणाम इंटरनेट सेवेवरही होतो. असे झाले तर जगभरातील इंटरनेट सेवा बंद अथवा अनेक दिवसांसाठी विस्कळीत होऊ शकते. असे झाले तर अनेक देशांची अर्थव्यवस्था, संरक्षण प्रणाली आणि दळणवळण सेवेवर गंभीर परिणामही होऊ शकतो.