दोन वर्षांपर्यंतच्या बालकांशी खूप बोला; होतील 'हे' फायदे | पुढारी

दोन वर्षांपर्यंतच्या बालकांशी खूप बोला; होतील 'हे' फायदे

न्यूयॉर्क : भाषा ही संवादातूनच विकसित होत असते. विशेषतः लहान मुलांशी संवाद साधणे अधिक महत्त्वाचे आहे. छोट्या बालकांशी खूप बोला, त्यांना प्रेम द्या, ते लवकर बोलणे शिकतील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळे त्यांचे उच्चारही चांगले होतात, त्यांचे वाचन सुधारते, शब्दभांडार वाढते आणि त्यांचा बुद्ध्यांकही वाढतो. एका पाहणीतून असे दिसून आले आहे की, ज्या मुलांशी त्यांच्या वयाच्या 18 ते 24 महिने या काळात खूप प्रेमाने भरपूर बोलले गेले असेल त्यांचा मेंदू अधिक तीक्ष्ण असतो.

अशा मुलांचे वाचन कौशल्यही तुलनेने अधिक असते, असे दिसून आले आहे. अर्थात, हे सर्व मुले शाळेला जाण्यास सुरुवात करण्याआधी कौटुंबिक स्तरावर होणे गरजेचे आहे. मुलांचे विशिष्ट प्रकारे संगोपन व्हावे, ज्यामध्ये त्यांना अक्षरज्ञान देण्याबरोबरच बोलण्याची सवय लावावी.

पीडियाट्रिक सर्जन डॅना सुसकिंड यांनी सांगितले की, माता-पिता हेच मुलांचे पहिले शिक्षक असतात. ते मुलांच्या मेंदूला पहिला खुराक देतात. अ‍ॅनाटॉमिकल, सायकोलॉजिकल आणि जीन स्टडीनुसार, एखाद्या बालकाचा मेंदू दोन वर्षांपर्यंत बराच विकसित होतो. तो आपल्या आसपासच्या गोष्टी समजून घेऊ लागतो. संशोधनातून असेही दिसून आले आहे की, सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी कुटुंब आणि शाळा बरोबरीने जबाबदार ठरतात.

अमेरिकेतील नॅशनल असेसमेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्रेसच्या रिपोर्टमधून असे दिसून आले आहे की, तेथील मुलांचे वाचन अतिशय कमजोर आहे. त्यांना नीट उच्चारही करणे कठीण जाते. कोरोना काळातील एकटेपणाने त्यांच्यासाठी आणखी अडचणी निर्माण केल्या आहेत. अर्थात, एकटा कोरोनाच यासाठी जबाबदार नाही. चौथीपर्यंतचे विद्यार्थी कसेबसे पुस्तक वाचू शकतात, ही अवस्था आहे. हीच स्थिती राहिली, तर ते लवकरच अमेरिकेतील कमी शिकलेल्या 3 कोटी 60 लाख प्रौढांमध्ये समाविष्ट होतील.

Back to top button