७९ हजारांत सहा तासांचा अंतराळ प्रवास | पुढारी

७९ हजारांत सहा तासांचा अंतराळ प्रवास

टोरांटो : जर तुम्हाला अंतराळ प्रवास करावयाचा असेल तर आता कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज नाही. एक कॅनेडियन कंपनी 2025 मध्ये लोकांना अंतराळ प्रवासावर नेणार आहे. याचे भाडेही फारच कमी असेल. तुम्ही केवळ 1360 कॅनेडियन डॉलर्स (सुमारे 79 हजार रुपये) भरून सहा तासांचा अंतराळ प्रवास करू शकणार आहे.

जी कंपनी लोकांना अंतराळ प्रवासावर नेणार आहे, तिचे नाव ‘स्पेस पर्सपेक्टिव्ह’ असे आहे. केवळ 79 हजारांत सहा तासांचा अंतराळ प्रवास? हे कसे शक्य आहे, असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो.

कारण जेफ बेजोस यांची कंपनी ‘ब्ल्यू ओरिजन’ व रिचर्ड ब्रेनसन यांची ‘व्हर्जिन गॅलेस्टिक’ ही कंपनी कोट्यवधी रुपयांच्या बदल्यात लोकांना अंतराळात प्रवास करवून आणत आहे. मात्र, ‘स्पेस पर्सपेक्टिव्ह’च्या ‘स्पेसशिप’मध्ये जास्त लोक बसण्याची क्षमता आहे. यामुळेच सीट बुक करण्याची किंमत लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

स्पेस पर्सपेक्टिव्हने आपल्या ‘नेपच्यून’ या स्पेसशिपमधून सहा तासांचा प्रवास करण्यासाठी प्रत्येक सीटला 79 हजार रुपये दर ठरविला आहे. नेपच्यून स्पेसशिप लोकांना अंतराळात घेऊन जाणार आहे.

मात्र, ते किती उंचीपर्यंत जाणार आहे, याची माहिती कंपनीने दिलेली नाही. पण एकदा का हा प्रवास केला की तुमच्या नावासमोर ‘अस्ट्रॉनॉट’ हा शब्द लागणार आहे. स्पेस पर्सपेक्टिव्ह कंपनी सध्या केनेडी स्पेस सेंटरवरून ऑपरेट करण्यात येत आहे.

Back to top button