तिबेटमध्ये आढळले प्राचीन काळातील 33 विषाणू

तिबेटमध्ये आढळले प्राचीन काळातील 33 विषाणू
Published on
Updated on

ल्हासा : रशियाच्या सैबेरिया तसेच ध्रुवीय प्रदेशातील पर्माफ्रॉस्ट म्हणजेच बर्फ, धूळमिश्रित वर्षानुवर्षे गोठलेल्या जमिनीतील बर्फ जागतिक तापमानवाढीमुळे वितळू लागला आहे. त्यामुळे हजारो वर्षे बर्फात सुप्तावस्थेत अडकलेले अनेक विषाणू बाहेर येत आहेत. आता हिमालयाच्या पठारावर असलेल्या तिबेटमध्येही हिमनद्या अर्थात ग्लेशियर प्रचंड वेगाने वितळत असल्याचे अशीच चिंता वाढली आहे. तिबेटमध्ये 22000 फूट उंचीवर 33 विषाणू आढळले आहेत. हे विषाणू पंधरा हजार वर्षांपासून बर्फाखाली गाडले गेले होते जे आता बाहेर पडत आहेत.

पर्माफ्रॉस्ट वितळल्याने प्रागैतिहासिक काळातील प्राण्यांचेही 'ममी' बनलेले अनेक देह सापडलेले आहेत. आर्क्टिक पर्माफ्रॉस्टमध्ये वूली मॅमथ या प्राण्याचे अवशेष सापडले आहेत. तसेच सैबेरियासारख्या भागातील पर्माफ्रॉस्टमध्ये अनेक 'झोंबी' म्हटले गेलेले विषाणूही सापडले आहेत. तिबेटच्या पठारावर असलेल्या गुलिया आईस कॅपजवळ शास्त्रज्ञांना 15 हजार वर्षे जुना विषाणू सापडला आहे. अनेक प्रजातींचे हे विषाणू आहेत. हे विषाणू मानवांसाठी धोका निर्माण करू शकतात अशी भीती ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट झी-पिंग झोंग यांनी व्यक्त केली आहे.

हे विषाणू चीनमधील तिबेटच्या वितळणार्‍या हिमनदीखाली समुद्रसपाटीपासून सुमारे 22 हजार फूट उंचीवर आढळले आहेत. शास्त्रज्ञांना 33 विषाणू सापडले आहेत. यापैकी 28 व्हायरस यापूर्वी कधीच पाहिले नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हे व्हायरस प्रत्येक ऋतूत जिवंत राहू शकतात. अती थंड किंवा अती उष्ण असा कोणत्याही प्रकारच्या तापमानाचा या विषाणूवर काहीच परिणाम होत नाही. यामुळे या व्हायरसचा फैलाव होऊन त्याचा संसर्ग झाल्यास तो आटोक्यात आणणे अशक्य होईल अशी चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

गेल्यावर्षीच तिबेटच्या हिमनद्यांमध्ये जीवाणूंच्या 1000 नवीन प्रजाती आढळल्या होत्या. या हिमनद्यांचे पाणी बॅक्टेरियासह चीन आणि भारताच्या नद्यांमध्ये मिसळल्यास पिण्याच्या पाण्यातून आजारांची लागण होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी तिबेटच्या पठारावर असलेल्या 21 हिमनद्यांचे नमुने गोळा केले होते. सन 2016 ते 2020 दरम्यान हे नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये जीवाणूंच्या 968 प्रजाती संशोधकांना आढळल्या होत्या. यापैकी 82% जीवाणू पूर्णपणे नवीन असल्याचे संशोधकांकडून सांगण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news