महासागरांमध्ये आहेत अ‍ॅमेझॉनपेक्षाही मोठी जंगले! | पुढारी

महासागरांमध्ये आहेत अ‍ॅमेझॉनपेक्षाही मोठी जंगले!

न्यूयॉर्क : समुद्रांची दुनिया अनोखीच आहे. जमिनीवर ज्याप्रमाणे आपण उंच पर्वत, दर्‍या किंवा ज्वालामुखी पाहत असतो तसेच समुद्रतळाशीही असतात. इतकेच नव्हे तर पाणवनस्पतींची जंगलेही समुद्रामध्ये असतात. आता युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी जगातील अनेक ठिकाणी असलेले ‘ओशियन फॉरेस्टस्’ म्हणजेच महासागरातील जंगले शोधून काढून त्यांचा एक नकाशा तयार केला आहे. या सर्व जंगलांचा आकार पाहिला तर ते भारताच्या क्षेत्रफळापेक्षा दुप्पट आहेत, असे दिसून येईल.

‘ओशियन फॉरेस्ट’ म्हणजे ‘सागरी जंगल’. हे जंगल सर्वसाधारणपणे ‘सीवीड’चे असते. हा शैवालाचाच एक प्रकार आहे. अन्य झाडा-झुडपांप्रमाणेच तेही सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने प्रकाश संश्लेषणाची क्रिया करून जिवंत राहतात. सीवीडची सर्वात मोठी प्रजाती 10 मीटर म्हणजेच 32 फूट उंचीची असू शकते. मोठ्या क्षेत्रात फैलावलेल्या या वनस्पती पाण्याच्या प्रवाहामुळे हलत-डुलत राहतात. ज्याप्रमाणे जमिनीवरील झाडे अनेक जीवांना आश्रय देतात त्याचप्रमाणे पाण्यातील या वनस्पतीही अनेक जीवांना अन्न व आश्रय देत असतात.

सागरी शैवालांच्या अनेक प्रजाती आहेत. त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडचे संतुलन बनवतात. सागरी बांबूंचेही अनेक उपयोग असतात. त्यांचे मजबूत खोडही प्रकाशसंश्लेषणाची क्रिया करते. सीवीडला पृथ्वीवरील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती मानली जाते. संशोधनांती असे दिसून आले आहे की, ओशियन फॉरेस्ट 60 ते 72 लाख चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळात व्यापलेले आहेत. अ‍ॅमेझॉनच्या सदाहरित वर्षावनांपेक्षाही हे क्षेत्र मोठे आहे.

Back to top button