‘यूएई’ नोव्हेंबरमध्ये चंद्रावर पाठवणार रोव्हर | पुढारी

‘यूएई’ नोव्हेंबरमध्ये चंद्रावर पाठवणार रोव्हर

दुबई : संयुक्त अरब अमिरात (यूएई) नोव्हेंबरमध्ये चंद्रावर आपले पहिले रोव्हर पाठवणार आहे. या अभियानाच्या प्रबंधकांनी ही माहिती दिली आहे. या रोव्हरला ‘राशिद’ असे नाव देण्यात आले आहे.

हमद अल मरजुकी यांनी ‘द नॅशनल’ या सरकारी वृत्तपत्राला सांगितले की, या रोव्हरचे दुबईतील सत्तारूढ परिवाराच्या नावावरून ‘राशिद’ हे नामकरण करण्यात आले आहे. या रोव्हरचे 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या काळात अमेरिकेतील फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस स्टेशनवरून प्रक्षेपण करण्यात येईल. ‘फाल्कन-9’ या स्पेस एक्सच्या रॉकेटच्या सहाय्याने हे प्रक्षेपण होईल. मरजुकी यांनी सांगितले की, आम्ही रोव्हरची पूर्ण तपासणी केली असून त्याच्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर खूश आहोत.

रोव्हरला लँडरशी जोडण्यात आले आहे. आता ते चांद्रभूमीवर जाण्यासाठी सज्ज आहे. सध्या ‘यूएई’चा एक उपग्रह मंगळाच्या वातावरणाचे अध्ययन करण्यासाठी मंगळाभोवती फिरत आहे. आता हे रोव्हर चंद्रावर पाठवले जाणार असून त्याचे वजन दहा किलो आहे. त्यामध्ये दोन हाय रिझोल्युशन कॅमेरे, एक मायक्रोस्कोपिक कॅमेरा, एक थर्मल इमेजरी कॅमेरा आणि अन्य काही उपकरणे जोडलेली आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button