कड्यासाठी शनीने नष्ट केला होता बर्फाळ चंद्र | पुढारी

कड्यासाठी शनीने नष्ट केला होता बर्फाळ चंद्र

न्यूयॉर्क : सुमारे 10 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जेव्हा महाकाय डायनासोर फिरत होते, त्याकाळात शनीने आपल्या बर्फाळ चंद्राची हत्या केली होती. केवळ स्वत:भोवती कडे तयार करण्यासाठी शनीने चंद्राची हत्या केली होती, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. उल्लेखनीय म्हणजे ब्रह्मांडात असंख्य ग्रह हे कड्यांविना आहेत. मात्र, यास शनी हा ग्रह अपवाद ठरला आहे.

शनीच्या कड्याबद्दल ‘सायन्स’ नामक जर्नलमध्ये 15 सप्टेंबर 2022 रोजी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, सुमारे 10 कोटी वर्षांपूर्वी शनीने आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या बळावर बर्फाळ चंद्राला आपल्याकडे खेचले. त्यावेळी हा चंद्र शनीवर आदळून त्याचे तुकडे-तुकडे झाले. हेच तुकडे शनीच्या चारही बाजूने पसरले आणि यापासून शनीभोवती अत्यंत आकर्षक आणि दाट कडे तयार झाले. दरम्यान, काही शास्त्रज्ञांच्या मते हे कडे शनीच्या निर्मितीबरोबरच तयार झाले आहे.

‘मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे स्कॉट ट्रेमेन आणि काल्टेकचे पिटर गोल्डरिच यांनी 1980 च्या सुरुवातीला म्हटले होते की, शनीच्या तुलनेत त्याचे कडे हे सुमारे 10 कोटी वर्षे युवा आहे. काहीवेळा या कड्यातील बर्फ आणि दगड हे आपसात आणि शनीवरही धडकत असतात. दरम्यान 2017 मध्ये नासाच्या कॅसिनीने शनीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. हा ग्रह 26.7 अंशांनी कलला असल्यामुळेच त्याने चंद्राला नष्ट करून त्याच्या अवशेषातून आपल्याभोवती कडे तयार केले असणार.

Back to top button