

न्यूयॉर्क : 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीवरील जेझेरो क्रेटरमध्ये आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा खडकाचा नमुना शोधला आहे. अलीकडेच घेतलेल्या या सॅम्पलमध्ये कार्बनिक पदार्थही आढळले आहेत. हा शोध एखादा खजिना शोधण्यासारखाच आहे, असे खुद्द 'नासा'ने ट्विट करून म्हटले आहे. यामुळे वैज्ञानिकांना असे वाटत आहे की एके काळी सरोवराचे ठिकाण असलेल्या जेझेरो क्रेटरमध्ये 3.5 अब्ज वर्षांपूर्वीचे वातावरण जीवसृष्टीला अनुकूल होते.
कॅलिफोर्नियाच्या पासाडेना येथे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील पर्सिव्हरन्स प्रोजेक्टचे वैज्ञानिक केन फार्ले यांनी सांगितले की ज्या खडकांची आम्ही डेल्टावर तपासणी करीत आहोत तिथे कार्बनिक पदार्थ आतापर्यंतच्या मोहिमेत सर्वाधिक प्रमाणात सापडले आहेत. पर्सिव्हरन्स रोव्हरची मोहीम 18 महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. याठिकाणी हे रोव्हर प्राचीन काळातील सूक्ष्म जीवांच्या अस्तित्वाचे संकेत शोधत आहे. आतापर्यंत रोव्हरने 12 खडकांचे नमुने घेतले आहेत.
2030 च्या दशकात हे नमुने पृथ्वीवर आणले जातील अशी अपेक्षा आहे. मंगळावरील जेझेरो क्रेटरचा आकार 45 किलोमीटरच्या परिघाचा आहे. एके काळी हे क्रेटर नदीशी जोडून तिथे विशाल सरोवराची निर्मिती करीत होते. याच क्रेटरच्या तळाशी मंगळाचा इतिहास दडलेला आहे असे संशोधकांना वाटते.