

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या किम्बर्ली परिसरातील गोगो फॉर्मेशनमध्ये संशोधकांना माशाचे एक जीवाश्म सापडले होते. कर्टिन विद्यापीठाच्या एका माहितीनुसार चुनखडीच्या दगडातील या जीवाश्माचे एक्स-रे आणि न्यूट्रॉन बीमचा वापर करून अध्ययन करण्यात आले. त्यामध्ये माशाच्या हृदयाचाही भाग असल्याचे दिसून आले. हे जगातील सर्वात प्राचीन हृदय असून ते 38,00,00,000 वर्षांपूर्वीचे आहे.
या माशामध्ये हे इंग्रजी 'एस' आकाराचे हृदय होते. कोमल उतींच्या या हृदयाचे एक थ्रीडी मॉडेल बनवण्यात आले. त्याला आर्थोडायर असे म्हटले जाते. 'सायन्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. प्रमुख संशोधक ट्रिनाजस्टिक यांच्या माहितीनुसार हा शोध आश्चर्यकारक आहे. ते म्हणाले, मी गेल्या वीसपेक्षाही अधिक वर्षांपासून जीवाश्मांचे अध्ययन केले आहे. मात्र, अत्यंत चांगल्याप्रकारे संरक्षित राहिलेले व तब्बल 38 कोटी वर्षांपूर्वीचे हृदय पाहून मी खरोखरच चकीत झालो होतो. या हृदयाच्या व जीवाश्माच्या अभ्यासावरून विकासाच्या टप्प्यांवरील निसटलेले दुवे शोधण्यास मदत मिळेल.