2300 वर्षांपूर्वीच्या खेळाच्या सामग्रीचा शोध | पुढारी

2300 वर्षांपूर्वीच्या खेळाच्या सामग्रीचा शोध

तेल अवीव : इस्रायलमध्ये हाइफा विद्यापीठाच्या संशोधकांनी डॉ. इयान स्टर्न यांच्या नेतृत्वाखाली मारेशा-बेट गुवरिन नॅशनल पार्कमध्ये केलेल्या उत्खननात हेलेनिस्टिक काळातील ‘अ‍ॅस्ट्रेगलोई’ची सामग्री शोधली आहे. हाडांचे हे तुकडे 2300 वर्षांपूर्वीचे आहेत. त्यांच्यावर ग्रीक देवी-देवतांची नावे कोरलेली असून काहींवर डाकू आणि ‘थांबा’ अशा अर्थाचे शब्दही आहेत. हा खेळ ग्रीक व रोमन लोकांमध्ये लोकप्रिय होता. भविष्यवाणीशी संबंधित असलेला हा प्राचीन खेळ आहे. यासाठी शेळ्या-मेंढ्यांच्या हाडांपासून फासे बनवले जात.

यापूर्वी या खेळाचे कांस्य व लाकडाचेही फासे मिळाले होते. ‘अ‍ॅस्ट्रेगलोई’च्या माध्यमातून देवी-देवता संवाद साधतात असा तत्कालीन लोकांचा विश्वास होता. या फाश्यांवर प्रेम आणि सौंदर्याची देवी अ‍ॅफ्रोडाईट, देवतांचे दूत हर्मीस, विवाहाशी संबंधित देवी हेरा आणि विजयाचे पंख असणारी देवी नाइक यांच्यासारख्या काही देवी-देवतांची नावे कोरलेली आहेत.

सर्वसामान्य लोक भविष्याशी संबंधित काही विचारण्यासाठी पुरोहितांकडे जात असत. हे पुरोहित फासे टाकून भविष्य सांगत. कोणतीही भविष्यवाणी सांगण्यासाठी एकावेळी पाच फासे फेकले जात असत. किंवा एका अ‍ॅस्ट्रेगलोईला पाच वेळा फेकले जात असे. हाइफा विद्यापीठातील डॉ. ली पेरी-गॅल यांनी सांगितले की मारेशामध्ये सापडलेली अ‍ॅस्ट्रेगलोई संख्येनेही अधिक आहे व गुणवत्तेनेही सरस आहे. आरोग्य, प्रसूतीशी संबंधित व मृत्यूच्या अनिश्चित वातावरणात तत्कालीन लोक या फाश्यांचा आधार घेत असत.

Back to top button