लघुग्रहाची दिशा बदलणार ‘नासा’चे यान | पुढारी

लघुग्रहाची दिशा बदलणार ‘नासा’चे यान

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ची ‘डार्ट’ मोहीम सध्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. 27 सप्टेंबरला या मोहिमेत एक यान लघुग्रहाला धडकून त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न करील. ही मोहीम यशस्वी झाली, तर भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या धोकादायक लघुग्रहांपासून बचाव करता येऊ शकेल. ‘नासा’ आणि एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेसएक्स’ने ही मोहीम आखली आहे.

या मोहिमेत 500 किलो वजनाच्या ‘डार्ट’ यानाला एका लघुग्रह प्रणालीवर धडकवण्यात येईल. या लघुग्रहाचे नाव ‘डिडीमॉस’ असून त्याच्याभोवती फिरणार्‍या उपग्रहाचे नाव ‘डिमोरफोस’ असे आहे. ‘डिमोरफोस’ हा एक प्रकारे ‘डिडीमॉस’चा चंद्र असून तो ‘डिडीमॉस’भोवतीची एक प्रदक्षिणा 11 तास 55 मिनिटांमध्ये पूर्ण करतो.

डिडीमॉसचा आकार 2,560 फूट असून डिमोरफोसचा आकार 525 फूट आहे. या मोहिमेचे लक्ष्य लघुग्रहाच्या मार्गाची दिशा बदलणे हे आहे. ‘कायनेटिक इम्पॅक्ट टेक्नॉलॉजी’च्या मदतीने ‘डार्ट’ यान ताशी 24 हजार किलोमीटर वेगाने डिमोरफोसला धडकेल. त्यामुळे दहा मिनिटांत ही सिस्टीम तुटेल आणि डिडीमॉसची ‘ट्रॅजेक्टरी चेंज’ होईल. ‘नासा’ने म्हटले आहे की, ही मोहीम आपल्या ग्रहाच्या सुरक्षेसाठी आखण्यात आली आहे. ती एक प्रकारे ‘डिफेन्स सिस्टिम’ आहे.

तसे पाहता डिटीमॉस लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही; मात्र कायनेटिक इम्पॅक्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ‘डार्ट’चा प्रयोग करण्याची ही चांगली संधी आहे. ही मोहीम नोव्हेंबर 2021 मध्ये लाँच करण्यात आली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार 27 सप्टेंबरला पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी ‘नासा टीव्ही’वर या घटनेचे थेट प्रसारण होईल. ‘नासा’च्या फेसबुक, ट्विटर आणि यू ट्यूब अकाऊंटस्वरही ती टेलिकास्ट केली जाईल.

Back to top button