डोळ्यांमधून का येतात अश्रू? ‘ही’ आहेत कारणे | पुढारी

डोळ्यांमधून का येतात अश्रू? 'ही' आहेत कारणे

नवी दिल्ली : बर्‍याच वेळा ‘अश्रुनीर वाहे डोळा’ अशी अवस्था होत असते. अर्थात ही अवस्था भावनिक कारणांमुळेच होते असे नाही. अगदी कांदा कापत असतानाही डोळ्यांमधून अश्रू येऊ शकतात. अश्रू का ओघळतात याची अनेक कारणे असतात.

संशोधकांनी अश्रूंची मुख्यतः तीन श्रेणीत विभागणी केलेली आहे. पहिल्या श्रेणीत डोळ्यांना कोरडे पडण्यापासून वाचवण्यासाठी अश्रू येतात. दुसर्‍या श्रेणीत विशिष्ट गंधाच्या प्रतिक्रियेतून अश्रू येतात. त्यामध्ये कांदा किंवा फिनाईलसारख्या तीव्र वासाचा परिणाम असतो. तिसर्‍या श्रेणीत भावनांचा समावेश होतो. अतिशय दुःख किंवा अतिशय आनंद झाला की डोळ्यांमधून अश्रू येऊ लागतात. मानवी मेंदूमध्ये एक लिंबिक सिस्टीम असते. ज्यामध्ये मेंदूचा हायपोथॅलेमस असतो. हा भाग मज्जासंस्थेच्या थेट संपर्कात असतो. या प्रणालीचा न्यूरोट्रान्समीटर सिग्नल देतो आणि आपण एखाद्या भावनेच्या टोकाला जाऊन रडतो. माणूस फक्त दुःखानेच नाही तर रागाने किंवा भीतीनेही रडू लागतो. त्याच्या डोळ्यांमधून अश्रू येऊ लागतात.

कांद्यामध्ये सिन-प्रोपॅन्थाईल-एस-ऑक्साईड नावाचे रसायन असते. कांदा कापल्यावर हे रसायन डोळ्यांमधील अश्रू ग्रंथीला उत्तेजित करते. त्यामुळे डोळ्यांमधून अश्रू येऊ लागतात. रडण्याचेही काही फायदे असतात. या क्रियेने शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यास मदत होते. थोड्या वेळेसाठी रडणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. त्यामुळे माणूस तणावमुक्त होतो.

Back to top button