पृथ्वीवरील 70 टक्के ऑक्सिजन येतो समुद्रातून! | पुढारी

पृथ्वीवरील 70 टक्के ऑक्सिजन येतो समुद्रातून!

न्यूयॉर्क : झाडा-झुडपांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो हे लहानपणापासूनच ठावूक झालेले असते. झाडं दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. मात्र, केवळ झाडांपासूनच ऑक्सिजन मिळतो असे नाही. नॅशनल जिओग्राफिकने याबाबत एक संशोधन केले आहे. त्यांच्या मते, जमिनीवरील झाडांपासून आपल्याला केवळ 25 ते 30 टक्के ऑक्सिजन मिळतो. मग उरलेला 70 टक्के ऑक्सिजन कुघून येतो? हा ऑक्सिजन मिळतो समुद्रांपासून!

पृथ्वीचा 71 टक्के भाग हा महासागरांनी व्यापलेला आहे. याच महासागरांपासून आपल्याला 70 टक्के ऑक्सिजन मिळत असतो. समुद्रातील फायटोप्लँक्टनपासून तसेच प्रोक्लोरोकोकसपासून हा ऑक्सिजन बनतो. ‘फायटोप्लँक्टन’ म्हणजे एक विशिष्ट प्रकारची शैवाल. ही लहान शेवाळं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करतात. महत्त्वाची बाब म्हणजे महासागरे आपल्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईडही शोषून घेतात. फायटोप्लँक्टन हे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्म सागरी शैवाल आहे. त्याच्या वाढीला सूर्यप्रकाशाची गरज असते.

समुद्राच्या पृष्ठभागावर हे शैवाल तरंगत असते. फायटोप्लँक्टनला नायट्रेटस्, फॉस्फेटस् आणि सल्फर यासारख्या अजैविक तत्त्वांचीही आवश्यकता भासते. दुर्दैवाने समुद्राचे तापमान वाढत असल्याने आता 1950 पासून अशा फायटोप्लँक्टनचे प्रमाण 40 टक्के घटले असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. महासागरांच्या तापमानावर फायटोप्लँक्टनचे प्रमाणही अवलंबून असते.

Back to top button