आता 23 सप्टेंबरला जाणार ‘आर्टेमिस-1’ | पुढारी

आता 23 सप्टेंबरला जाणार ‘आर्टेमिस-1’

वॉशिंग्टन : ‘नासा’ने आपल्या स्पेस लाँच सिस्टीमची (एसएलएस) रॉकेटची दुरुस्ती केली आहे. ‘एसएलएस’ वर लिक झालेल्या फ्यूएल सील्सना गेल्या आठवड्यात इंजिनिअरनी बदलले आहे. या महिन्याच्या सुरुवातीस ‘एसएलएस’च्या इंधन लाईन्सपैकी एक लिक झाली होती. त्यामुळे ‘आर्टेमिस-1’चे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. आता हे यान 23 सप्टेंबरला प्रक्षेपित केले जाणार आहे. चंद्रावर पुन्हा एकदा मानवाला घेऊन जाण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नातील हा पहिला टप्पा आहे.

‘नासा’ने आता इंधन परीक्षणासाठीही एक योजना आखली आहे जेणेकरून बदललेली सील योग्य पद्धतीने काम करीत आहे की नाही हे पाहता येईल. ‘नासा’ने एका ब्लॉग पोस्टमध्ये घोषणा केली आहे की ‘आर्टेमिस-1’ किंवा ‘आर्टेमिस-आय एसएलएस’ वरील हायड्रोजन लिकशी निगडीत सील्सना यशस्वीरीत्या बदलण्यात आले आहे. याच कारणामुळे 3 सप्टेंबरला यानाचे प्रक्षेपण दुसर्‍यांना थांबवण्यात आले होते.

आता ते 23 सप्टेंबरला करण्याची योजना आहे. 23 सप्टेंबरला ते झाले नाही तर 27 सप्टेंबरपर्यंत हे प्रक्षेपण करण्यात येईल. 1972 मध्ये चंद्रावर शेवटची मानव मोहीम झाली होती. त्यानंतर अद्याप चंद्रावर माणसाचे पाऊल पडलेले नाही. आता ‘नासा’ने पुन्हा एकदा आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच्या यानाची ही चाचणी असून ती मानवरहीत आहे.

Back to top button