जगातील सर्वात बुटक्या माणसाची उंची अवघी 70 सेंमी | पुढारी

जगातील सर्वात बुटक्या माणसाची उंची अवघी 70 सेंमी

बगोटा : जगात प्रत्येक व्यक्तीची उंची वेगवेगळी असते. कोण फारच उंच तर कोणाची उंची अत्यंत कमी असते. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, जगातील सर्वात कमी उंचीचा माणूस कोठे राहतो आणि त्याची उंची किती आहे? जगामधील सर्वात कमी उंची असलेल्या माणसाचे नाव ‘एडवर्ड नीनो’ असून तो कोलंबियातील बगोटा येथे राहतो. त्याचा जन्म 10 मे 1986 रोजी झाला असून त्याच्या कमी उंचीची नोंद 13 एप्रिल 2010 रोजी ‘गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये झाली.

त्यावेळी त्याची उंची अवघी 70.21 सेंमी इतकी म्हणजे सहा महिन्यांच्या बाळाइतकी होती. एडवर्डचा विक्रम नेपाळच्या खगेंद्र थापाने मोडीत काढला. 14 ऑक्टोबर 1992 रोजी जन्मलेल्या थापाची उंची अवघी 67.08 सेंमी इतकी होती. मात्र, त्याचे 17 जानेवारी 2020 रोजी म्हणजे वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले.

ज्यावेळी एडवर्ड चार वर्षांचा होता, त्यावेळी त्याच्या आई-वडिलांच्या नजरेस एडवर्डची उंची वाढत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी एडवर्डला डॉक्टरांना दाखविले. तेव्हा त्याला ‘हाईपोथायरायडिज्म’ नामक आजार झाल्याचे समजले. उंची वाढत नसली तरी एडवर्ड निराश झाला नाही. त्याने यावर मात करत कठोर परिश्रमाने तो सध्या एक मॉडेल बनला आहे. याशिवाय तो उत्तम नृत्यही करतो. नृत्य करताना लोक त्याला भान विसरून पहात असतात.

Back to top button