चीनने चंद्रावर शोधले नवे अनोखे खनिज | पुढारी

चीनने चंद्रावर शोधले नवे अनोखे खनिज

बीजिंग : चीनच्या संशोधकांनी चंद्रावर एका नव्या खनिजाचा शोध लावला आहे. अशी कामगिरी करणारा चीन हा जगातील तिसरा देश बनला आहे. चीनच्या अणुऊर्जा प्राधिकरणाचे उपाध्यक्ष डोंग बाओतोंग यांनी सांगितले की या नव्या खनिजाला ‘चेंजसाईट-वाय’ असे नाव देण्यात आले आहे.

चंद्रावर ज्वालामुखीमुळे बनणार्‍या दगडांमधील म्हणजेच बेसॉल्ट खडकांमधील कणांच्या स्फटिकात ‘चेंजसाईट-वाय’ हे खनिज आढळले. हे एक फॉस्फेट खनिज आहे. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार बीजिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ युरेनियन जियॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी चंद्रावरील 1,40,000 कणांमधून एक्स-रे विवर्तनासारख्या उच्च तंत्राने सुमारे 10 मायक्रॉनची त्रिज्या असलेल्या एका स्फटिकातून हे खनिज वेगळे केले व त्याचे विश्लेषणही केले.

आंतरराष्ट्रीय खनिज संघाच्या (आयएमए) नवे खनिज, नामकरण आणि वर्गीकरण आयोगाने (सीएनएमएनसी) या नव्या खनिजाची पुष्टी केली असून त्याचे नामकरणही स्वीकारले आहे. मानवाने चांद्रभूमीवर शोधलेले हे सहावे खनिज आहे. यापूर्वी अमेरिका व रशियानेही चंद्रावर नवे खनिज शोधलेले आहे. चीनच्या ‘चांग ई-5’ मोहिमेत 2020 मध्ये चंद्रावरून सुमारे 1,731 ग्रॅम वजनाचे नमुने पृथ्वीवर आणण्यात आले होते. गेल्या 40 वर्षांच्या काळात पृथ्वीवर आणलेले हे चंद्रावरील पहिलेच नमुने आहेत. त्यांच्या अभ्यासातून हा नवा शोध लावण्यात आला आहे.

Back to top button