दालचिनीचा चहा आरोग्यासाठी गुणकारी | पुढारी

दालचिनीचा चहा आरोग्यासाठी गुणकारी

नवी दिल्ली : जगभरात अनेक प्रकारचे चहा पाहायला मिळतात. अगदी निळ्या गोकर्णीचा आणि सफरचंदाचाही चहा असतो. अर्थातच हा चहा आपण पितो तशा पद्धतीचा नसतो व त्याला चहा म्हणण्यापेक्षा एक ‘औषधी काढा’ म्हणणेच अधिक योग्य ठरेल असा असतो. त्यामध्येच दालचिनीच्या चहाचा समावेश आहे. हा चहा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एक इंच दालचिनीची काडी घालून 150 मिली पाणी अर्धे होईपर्यंत उकळले आणि त्यामध्ये लिंबाचा रस व मध मिसळला की दालचिनीचा चहा तयार होतो! असा चहा विशेषतः लठ्ठपणा किंवा उच्च रक्तदाबासारख्या समस्यांमध्ये गुणकारी ठरतो. दालचिनीत मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, कार्बोहायड्रेटस्, प्रथिने, कॅल्शियम, मँगेनिज, तांबे आदी पोषक घटक असतात. हा चहा चिंता व तणाव कमी करून मन शांत करतो तसेच मेंदूच्या कार्याला चालना देतो.

या चहाने चयापचय क्रियेची गती वाढून चरबी लवकर जळते व लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते. हा चहा नियमित पिल्याने रक्तदाब नियंत्रित होण्यासाठी मदत होते. दालचिनीमधील अँटिऑक्सिडंटस् शरीरातील विषारी व मुक्त रॅडिकल्सशी लढतात. त्वचेवरील मुरुम, डाग कमी करण्यासाठीही हे लाभदायक ठरते. हा चहा नियमितपणे पिल्यास मासिक पाळीदरम्यान वेदना आणि पोटदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

Back to top button