पाकिस्तानातील पुराचा मोहेंजोदडोलाही फटका! | पुढारी

पाकिस्तानातील पुराचा मोहेंजोदडोलाही फटका!

इस्लामाबाद : सिंधू संस्कृतीमधील 4500 वर्षांपूर्वीचे अनमोल अवशेष असलेल्या मोहेंजोदडोलाही पाकिस्तानातील भीषण पुराचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे तेथील विटांच्या प्राचीन भिंती कोसळल्या आहेत. मोहेंजोदडो येथे सिंधू संस्कृतीमधील आखीवरेखीव शहराचे अवशेष सापडलेले होते. तेथील नाल्यांमधून या पावसाचे पाणी वाहून गेले असले तरी मुसळधार पावसाचा तडाखा तेथील हजारो वर्षे जुन्या भिंती सहन करू शकल्या नाहीत.

या जागतिक वारसास्थळावरही पुराने संकट आणल्याचे पाहून जगभरातील पुरातत्त्व संशोधक चिंतेत आहेत. मोहेंजोदडोचे संरक्षक अहसान अब्बासी यांनी सांगितले की मुसळधार पावसामुळे तेथील भिंतींचा पाया डगमगू लागला आहे. त्याची दुरुस्ती केल्यास या क्षेत्रातील प्राचीनत्वही संकटात येईल. इतिहासकारांनीही अशा प्रकारच्या डागडुजीला विरोध दर्शवला आहे. हे सिंधू संस्कृतीमधील 4500 वर्षांपूर्वी वसवलेले शहर आहे. तिथे रुंद रस्ते, दुतर्फा घरे, नाले, सार्वजनिक स्नानगृह, सार्वजनिक इमारती यांचे अवशेष पाहायला मिळतात.

ब्रिटिश काळात 1922 मध्ये हे शहर सापडले होते. ते सध्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात येते. हे प्राचीन शहर व तेथील संस्कृती कशी नष्ट झाली हे अद्यापही एक रहस्यच आहे. पाकिस्तानात पुरामुळे सध्या हाहाकार माजला असून या आपत्तीमध्ये 1,343 लोकांचा मृत्यू झाला आहे. सव्वातीन कोटी लोकांना पुराचा फटका बसला आहे. मोहेंजोदडोजवळील सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा एक बौद्ध स्तुप मात्र या आपत्तीत सुरक्षित राहिलेला आहे.

Back to top button