बडीशेपमध्ये असतात कर्करोगरोधक गुणधर्म | पुढारी

बडीशेपमध्ये असतात कर्करोगरोधक गुणधर्म

नवी दिल्‍ली : मुखशुद्धीसाठी बडीशेप आवडीने खाल्‍ली जात असते. मात्र, तिचा तितकाच उपयोग आहे असे नाही. ही बडीशेप आरोग्यासाठीही विविध प्रकारे लाभदायक ठरते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशेषतः बडीशेपमध्ये कर्करोगाशी लढण्याचेही गुणधर्म असतात. बडीशेप ही स्तन व यकृताच्या कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी मदत करते.

बडीशेपमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, मॅग्‍नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. हे घटक हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. यामधील फायबर हे हानिकारक कोलेस्टेरॉलचा धोका कमी करते. बडीशेपमध्ये लेक्टोजेनिक गुणधर्म असतात, जे आईचे दूध वाढवण्यासाठी मदत करतात. बडीशेप रक्‍तातील प्रोलॅक्टिनची पातळी वाढवण्यासाठीही उपयुक्‍त आहे.

शरीराला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी म्हणजेच शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्यासाठी बडीशेपचे पाणी उपाशी पोटी पिणे लाभदायक ठरते. यामुळे त्वचेच्याही अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. अपचनाच्या समस्येवर बडीशेप गुणकारी आहे. बडीशेपच्या सेवनाने रक्‍तातील हिमोग्लोबिनही वाढते. बडीशेपमध्ये झिंक, अँटिइन्फ्लेमेटरी, अँटिऑक्सिडंटस् गुणधर्म असतात. त्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.

Back to top button