आता ‘झुरळ’ पकडणार चोराला! | पुढारी

आता ‘झुरळ’ पकडणार चोराला!

टोकियो : जपानच्या संशोधकांनी आता एक असे यांत्रिक झुरळ बनवले आहे जे चोराचा माग काढू शकते. या कृत्रिम झुरळाच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. या ‘सायबोर्ग’ झुरळाचा उपयोग गुन्हेगारांना शोधण्याबरोबरच कुणी संकटात सापडलेले असेल तर त्यांच्या शोधासाठीही होऊ शकतो.

भूकंप, पूर, वादळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्त व्यक्‍तीशी संपर्क साधणे, त्याचा बचाव करणे किंवा त्याच्यापर्यंत मदत पोहोचवणे यासारख्या गोष्टी अशा यांत्रिक साधनामुळे सुकर होऊ शकतात. ‘एनपीआय फ्लेक्झिबल इलेक्ट्रॉनिक्स’ जर्नलमध्ये या संशोधनाबद्दलची माहिती दिली आहे. त्यानुसार संशोधकांनी कोणत्याही विद्युत उपकरणाच्या मदतीशिवाय हा सायबोर्ग रिचार्ज करून दाखवला आहे. या तंत्राद्वारे जीव व तंत्रज्ञानाची उत्तमरीत्या सांगड घातल्याचे दिसून आले. बॅटरीचा कमीत कमी वापर होईल अशा सेमीकंडक्टर चिपद्वारे सायबोर्गची निर्मिती करण्यात आली आहे.

हे तंत्रज्ञान जपानच्या ‘सेंटर फॉर इमर्जंट मॅटर सायन्स’च्या संशोधकांनी विकसित केले आहे. या टीमने या सायबोर्ग झुरळाचा एक नमुना तयार केला आणि ते थेट जिवंत झुरळाच्या नर्व्हस सिस्टीमशी म्हणजेच मज्जा किंवा चेतासंस्थेशी जोडले गेले. निरीक्षणात असे दिसून आले की त्याचे पॉवर आऊटपूट आधीच्या नमुन्यापेक्षा 50 पटीने अधिक वाढले आहे. हे सायबोर्ग झुरळ अल्ट्राथीन सोलर सेलच्या मदतीने बनवले गेले आहे.

Back to top button