चारही बाजूंनी प्रकाशाचे तरंग असलेला तारा | पुढारी

चारही बाजूंनी प्रकाशाचे तरंग असलेला तारा

वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आता एक असे छायाचित्र टिपले आहे जे पाहून खगोलशास्त्रज्ञही चकीत झाले आहेत. या तार्‍याच्या चारही बाजूंनी प्रकाशाच्या कड्या व तरंग दिसून आल्या आहेत. हे नेमके कशामुळे घडत आहे हे जाणून घेण्याचा संशोधक प्रयत्न करीत आहेत.

हे छायाचित्र जुलैमध्ये टिपण्यात आले आहे. ते सिटीजन सायंटिस्ट जूडी श्मिट यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. या छायाचित्रात ‘डब्ल्यूआर140’ या नावाने ओळखला जाणारा तारा आहे. तो अनेक तरंगांनी वेढलेला आहे. पाण्यात दगड फेकल्यावर जसे तरंग निर्माण होतात तसे तरंग या तार्‍याभोवती आहे. हे पूर्णपणे गोलाकार नसून काही अंशी ते चौकोनीही आहे. जूडी श्मिट यांनी म्हटले आहे की ही एक नैसर्गिक घटना असून ती अतिशय सरळही आहे.

मात्र, आपण तिच्याकडे एकाच बाजूने पाहत असल्याने ती वेगळी वाटते. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप सायन्स वर्किंग ग्रुपमधील वैज्ञानिक मार्क मॅककॉग्रीन यांनी सांगितले ही निळी संरचना टेलिस्कोपच्या ‘एमआयआरआय’मध्ये चमकदार अशा ‘डब्ल्यूआर140’ तार्‍यापासून होणार्‍या ऑप्टिकल विवर्तनामुळे बनलेली कलाकृती आहे.

Back to top button