अ‍ॅम्ब्युलन्सवर का असते उलटे स्पेलिंग? | पुढारी

अ‍ॅम्ब्युलन्सवर का असते उलटे स्पेलिंग?

नवी दिल्‍ली : काही गोष्टी आपण रोजच पाहत असतो; पण त्या तशाच का आहेत याचा विचार फारसा करीत नाही. अ‍ॅम्ब्युलन्सवर आपण उलट्या क्रमात स्पेलिंग पाहिल्यावर काहींना ते तसे का आहे, असे वाटतही असेल. मात्र, त्याची किती लोकांना माहिती आहे? ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ या इंग्रजी शब्दाच्या स्पेलिंगमधील अक्षरे उलट्या क्रमाने लिहिण्याचेही एक विशिष्ट कारण आहे.

जर तुम्ही या रुग्णवाहिकेला नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की हा शब्द गाडीच्या बाजूला उलटा लिहिलेला नसतो तर गाडीच्या समोरच्या भागातच उलटा असतो. हे केवळ आरशातील प्रतिमेसाठी केले जाते, जे समोरील वाहनचालकाला त्याच्या गाडीच्या आरशात दिसेल व त्याला सरळ वाचता येईल. आपल्या सेल्फी कॅमेर्‍याबाबत जसे घडते तसाच हा प्रकार आहे. त्यामध्ये ‘मिरर इमेज’ म्हणजेच आरशातील उलटे चित्र दिसते. वाहनांमध्ये बाजूचे आणि मागील आरसे हे ‘रेप्लिका मिरर’ असतात, जे प्रतिमेला उलटे दाखवतात.

दूरवरून येणारी वाहने यामुळे आपल्याला जवळ दिसतात. अपघात रोखण्यासाठी असे आरसे बनवले जातात. या आरशांमध्ये लिहिलेले शब्द उलटे दिसतात. अशा स्थितीत ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ हे सरळ लिहिले तर ते पुढील वाहनाच्या आरशात उलटेच दिसू शकते. त्यामुळे मागील वाहन ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ आहे हे संबंधित वाहनचालकाला नीट समजावे व त्याला ती अक्षरे नीट वाचता यावीत यासाठी प्रत्यक्ष रुग्णवाहिकेवर ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ हे उलट्या क्रमात लिहिलेले असते. ही अक्षरे अनेकदा लाल किंवा निळ्या रंगात असण्याचे कारण म्हणजे हे रंग आपल्याला दूरवरूनही पाहता येतात.

Back to top button