रहस्यमय तपकिरी रंगाच्या खुजा तार्‍याचा शोध | पुढारी

रहस्यमय तपकिरी रंगाच्या खुजा तार्‍याचा शोध

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने एका दुर्मीळ आणि रहस्यमय अशा करड्या, तपकिरी रंगाच्या खुजा तार्‍याचा शोध लावला आहे. हा तारा सुमारे 13 अब्ज वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे. या खुजा तार्‍याचा शोध अपघातानेच लागला असल्याने त्याला ‘द अ‍ॅक्सिडंट’ असे नाव देण्यात आले आहे. या तार्‍याचा एक व्हिडीओ ‘नासा’ने सोशल मीडियातही शेअर केला आहे.

असे खुजा आकाराचे खगोल म्हणजे अवकाशातील रहस्यमय घटक आहेत. ते एखाद्या विशाल आकाराच्या व वायूचा गोळाच असलेल्या ग्रहाजवळ किंवा एखाद्या छोट्या तार्‍याजवळ असतात. त्यांचा आकार इतका मोठा नसतो की त्यांच्यामध्ये तार्‍यांप्रमाणे हायड्रोजन फ्यूजन होईल. असेच विचित्र तारे आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेत आणखीही असू शकतात.

कॅलिफोर्नियाच्या कॅलटेकमधील खगोलशास्त्रज्ञांनी या ‘वाईज 1534-1043’ या खुजा तार्‍याला शोधले. हा तारा पृथ्वीपासून 50 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा तारा आतापर्यंत शोधलेल्या अशाच दोन हजार अवकाशीय घटकांपेक्षा बराच वेगळा होता.

संबंधित बातम्या

काही वेव्हलेंग्थमध्ये हा तारा चमकदार दिसतो तर काही वेव्हलेंग्थमध्ये हलक्या प्रकाशाचा दिसतो. हा तारा अंतराळात ताशी 5 लाख मैल वेगाने जात आहे. त्याचा वेग आसपासच्या अन्य करड्या रंगाच्या खुजा तार्‍यांच्या तुलनेत अधिक आहे.

Back to top button