जगातील सर्वात सुंदर डास पाहिला का? | पुढारी

जगातील सर्वात सुंदर डास पाहिला का?

टोरांटो : कीटकांमध्येही अनेक कीटक सुंदर असतात. डास हा सुद्धा एक कीटकच आहे; पण त्याच्याकडे सौंदर्यही असू शकते असे आपल्याला वाटणार नाही.

डास म्हटलं की माणसाला चावून बेजार करणार्‍या माद्या आणि त्यांच्यामुळे फैलावणारे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिकासारखे रोगच आठवतात. आता मात्र एका चावणार्‍याच मादीचे सुंदर छायाचित्र समोर आले आहे. हा कदाचित जगातील सर्वात सुंदर डास असू शकतो!

डासांची ही चमकदार, सुंदर रंगाची प्रजाती मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळते. तिचे नाव आहे ‘सॅबेथेस’. कॅनडातील ओंटारियो येथील गिल विझेन यांनी या डासाचे छायाचित्र टिपून घेतले.

यंदाच्या ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर’ या स्पर्धेत जगभरातील वन्यजीव छायाचित्रकारांनी 50 हजारांपेक्षाही अधिक छायाचित्रे पाठवलेली आहेत. त्यामध्येच या छायाचित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गिल यांनी सांगितले की सॅबेथेस डासांना कॅमेर्‍यात टिपून घेणे अतिशय कठीण असते.

विशेषतः इक्वेडोरमधील अ‍ॅमेझॉन जंगलातील उकाडा आणि दमट हवेत या डासांचे छायाचित्र टिपण्याइतका संयम ठेवणे कठीण आहे. तिथेच हे छायाचित्र टिपले आहे. या डासाच्या शरीरावरील मोरपंखी रंग, त्याचे सुंदर फर असलेले सडपातळ पाय आणि लांब अँटेना लक्ष वेधून घेतात.

Back to top button