

वॉशिंग्टन : जलवायू परिवर्तन, ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन व समुद्र पातळी वाढीसंदर्भात अमेरिकन सरकारने एक घाबरवणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार 2021 मध्ये कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे निर्बंध आणि लॉकडाऊन असूनही जगभरात ग्रीनहाऊस वायूंचे विक्रमी उत्सर्जन झाले आहे. याशिवाय समुद्राची पातळीही वाढली. या संशोधनासाठी जगभरातील 60 देशांच्या सुमारे 530 शास्त्रज्ञांनी मदत केली आहे.
'नॅशनल ओशियानिक अँड अॅटमोस्फेअरिक अॅडमिनिस्ट्रेशन'चे (छजअअ) रिक स्पिनरॅड यांनी सांगितले की, आमच्या संशोधनातून असे सिद्ध होते की, आम्हाला जलवायू परिवर्तन रोखण्यासाठी आणखी कठोर पावले उचलावी लागणार आहेत. आमच्याजवळ सध्या हवामानातील बदलाचे पुरावेच आहेत. या बदलांचा परिणाम सध्या संपूर्ण जगावर होत आहे. मात्र, यामुळे कोणालाच कसलाच फायदा होत नसून केवळ नुकसानच होत आहे.
रिक यांनी पुढे सांगितले की, 2020 मध्ये संपूर्ण जगातील रहदारी बंद होती. लॉकडाऊनमुळे रहदारी बंद ठेवण्यात आल्याने ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी झाले. 2021 मध्येही कोव्हिडसंदर्भातील निर्बंध व लॉकडाऊन होतेच. असे असूनही या वायूंचे विक्रमी उत्सर्जन झाले. दरम्यान, 'स्टेटस ऑफ द क्लायमेट' नामक अहवालातील पॅलियोक्लायमेट आकडेवारीनुसार ग्रीनहाऊस उत्सर्जनाचे प्रमाण गेल्या 10 लाख वर्षांत गतसाली जास्त होते. यामुळे समुद्राची पाणी पातळीही वाढली.