पाषाण युगातील महिला कशी दिसत होती?

पाषाण युगातील महिला कशी दिसत होती?

क्‍वालालंपूर : सध्याच्या मलेशियात 5,700 वर्षांपूर्वी राहणारी एक महिला कशी दिसत होती याचे एक चित्र आता संशोधकांनी विकसित केले आहे. युनिव्हर्सिटी सैन्स मलेशियाच्या पुरातत्त्व संशोधकांना या महिलेचा सांगाडा वायव्य मलेशियातील पेनांग येथे 2017 मध्ये सापडला होता. पेनांगमधील गुहार केपाह या निओलिथिक साईटवर करण्यात आलेल्या उत्खननात हा सांगाडा आढळला होता व त्यामुळेच या महिलेला 'पेनांग वूमन' म्हणून ओळखले जात होते.

याठिकाणी सापडलेल्या एकूण 41 सांगाड्यांपैकी तो एक होता. त्याच्या रेडिओकार्बन चाचणीतून असे दिसून आले होते की ही महिला निओलिथिक किंवा नव्या पाषाण युगाच्या काळात म्हणजेच इसवी सन पूर्व 8 हजार ते 3300 वर्षे या काळातील आहे. तिच्या कवटीवरून तिच्या चेहर्‍याची ही कल्पना करण्यात आली आहे.

या अवशेषांमध्ये तिची जवळजवळ पूर्ण स्थितीतील कवटी आढळली होती. या कवटीचे सीटी स्कॅनिंग करण्यात आले. तसेच सध्याच्या मलेशियन लोकांची थ्री-डी इमेजरी करण्यात आली. विद्यापीठातील संशोधकांसह ब्राझीलचे ग्राफिक्स एक्सपर्ट सिसेरो मोरीस यांनी याबाबत संशोधन करून या महिलेच्या चेहर्‍याची ठेवण कशी होती हे निश्‍चित केले. ही महिला मृत्यूवेळी सुमारे 40 वर्षांची होती.

तिच्या कवटीला योग्य अशा चेहर्‍यासाठी थ्री-डी रिकन्स्ट्रक्टेड कॉम्प्युटेड टोमोग्राफीचा वापर करण्यात आला. त्यावरून या महिलेचा चेहरा कसा असू शकतो याचे एक चित्र उभे करण्यात आले. त्यानुसार या महिलेचे नाक व ओठ मोठे होते. अर्थात ही त्या महिलेची अचूक प्रतिकृती नाही असेही संशोधकांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news