कामावेळी का येते जांभई?, जाणून घ्या अधिक | पुढारी

कामावेळी का येते जांभई?, जाणून घ्या अधिक

लंडन : आपल्याशी संबंधितच अनेक गोष्टींची आपल्याला माहिती नसते व त्याबाबत आपल्याला फारशी जिज्ञासाही नसते. स्वप्नं का पडतात यापासून ते जांभई का येते इथंपर्यंतच्या अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. जांभई ही एक शरीराची प्रतिक्षिप्‍त क्रिया असते व त्यावर माणसाचे नियंत्रण नसते. कामाच्या वेळी जांभई का येते, याबाबत मात्र काहींना कुतूहल असू शकते. संशोधकांनी म्हटले आहे की काम करीत असताना शरीराचे विशेषतः मेंदूचे तापमान सामान्यापेक्षा थोडे वाढते. अशा वेळी वाढलेले तापमान सामान्य करण्यासाठी अशा जांभईचा उपयोग होतो!

तोंड पूर्ण उघडे ठेवून जोराने हवा आत घेणे व त्यानंतर लगेचच ती बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला ‘जांभई’ असे म्हणतात. मनुष्यच काय अन्य प्राणीही जांभई देतात. आपल्या शरीरात घडणार्‍या प्रत्येक क्रियेमागे मेंदूची भूमिका असते. कामाच्या दरम्यान जांभई देणे हे तुमच्या मेंदूचे तापमान सामान्य करण्यासाठी कार्य करते, असे प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या अहवालात म्हटले आहे. ‘अ‍ॅनिमल बिहेवियर’ नावाच्या एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार ज्या लोकांची जांभई जास्त वेळ येते, त्यांचा मेंदू अतिशय वेगाने काम करतो. जांभईवर केलेल्या एका संशोधनातून असेही दिसून आले की कित्येक वेळा जांभईमुळेही संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे जांभई देत असताना तोंडासमोर हात किंवा रूमाल धरणे गरजेचे आहे. 2004 मध्ये जर्मनीच्या म्युनिखमधील मानसोपचार रुग्णालयात झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले की लोक थंडीच्या काळात सर्वात जास्त वेळा जांभई देतात.

Back to top button