एकटे राहिल्याने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम | पुढारी

एकटे राहिल्याने होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

लंडन : काही पारमार्थिक साधना किंवा संशोधनासारखे अभ्यासाचे काम असल्याने स्वेच्छेने स्वीकारलेला एकांतवास वेगळा आणि लादलेला एकाकीपणा वेगळा. एकांतवासाचा त्रास होत नाही, पण एकाकीपणा भयाण असतो. हल्‍ली नातेसंबंध दुरावल्याने अनेक लोक एकटे राहतात. काहींना जोडीदार नसतो व त्यामुळे ‘सिंगल’ राहतात. अशा एकटेपणाचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

एकटे राहून तुम्ही तुमची कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकता, पण त्या कामाचा आनंद किंवा दुःखही तुम्ही भोगू शकत नाही. एकटे राहिल्याने तुम्ही तुमच्या अडचणीही कुणाला सांगून मदत घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. तुमचे काम हे ताण-तणावाचे असेल तर तुम्ही नैराश्याचे बळी ठरू शकता, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकटे राहिल्याने माणूस भावनिकद‍ृष्ट्या कमजोर होतो व छोट्या छोट्या गोष्टींनीही माणसाला रडू येऊ शकते. एकटे राहिल्याने चिडचिड वाढते व लोकांमध्ये मिसळणे माणूस विसरून जातो.

एकटे राहिल्याने आनंद कमी आणि तणाव जास्त होऊ लागतो. त्याचा परिणाम झोपेवरही होतो. या सर्वांची परिणती शरीर व मनाच्या आरोग्यावरील दुष्परिणामात होते. त्यामुळे ‘एकसे भले दो’ व कुटुंब, समाज, मित्रमंडळी, आप्‍तेेष्ट, प्रियजन यांची तन-मनाच्या आरोग्यासाठीही गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे!

Back to top button