प्रयोगशाळेत बनवलेल्या उंदरांमध्ये मेंदू, हृदयाचा विकास | पुढारी

प्रयोगशाळेत बनवलेल्या उंदरांमध्ये मेंदू, हृदयाचा विकास

लंडन : शरीरातील काही स्टेम सेल्स म्हणजेच मूळपेशी असतात. या पेशी अशा असतात ज्यांचे रूपांतर शरीरातील कोणत्याही अवयवाच्या पेशीत करता येऊ शकत असते. अशा स्टेमसेलवर आधुनिक काळात मोठेच संशोधन झाले असून विविध उपचारांसाठी तसेच नव्या प्रयोगांसाठीही स्टेमसेल्सचा वापर केला जात आहे. संशोधकांनी उंदरांमधील अशाच स्टेमसेल्सचा वापर करून कृत्रिमरीत्या त्यांचे भ्रूण तयार केले. आता या भ्रूणांमध्ये नैसर्गिक भ्रूणांप्रमाणेच मेंदू व हृदयही विकसित झाले आहेत.

प्रयोगशाळेत बनवलेले हे भ्रूण बीजांड व शुक्राणूंशिवायच विकसित झालेले आहेत. हे भ्रूण वेगाने फिरणार्‍या ‘फेरीस व्हील’ या उपकरणात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये ते 8.5 दिवस तग धरून राहिले. मादी उंदरांच्या गर्भधारणेच्या जवळपास निम्म्या काळाइतका हा काळ आहे. या काळात भ्रुणाचे पोषण करण्यासाठी त्याच्याभोवती योकची पिशवीही तयार झाली. या भ्रुणांमध्ये आपोआपच पचनमार्ग, चेतातंतू किंवा केंद्रीय चेतासंस्थेची (मज्जासंस्था) प्रारंभिक स्थिती निर्माण झाली.

भ्रुणांमध्ये धडकणारे हृदय व विविध उपविभाग असलेला मेंदूही विकसित झाला. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. इंग्लंडच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील मॅग्दालेना झेर्निका-गोएत्झ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Back to top button