

वॉशिंग्टन : अमेरिकन वैज्ञानिकांनी एक असे कोटिंग म्हणजे स्तर तयार केला आहे जो कोरोना विषाणू, ई-कोलाय व एमआरएसए बॅक्टेरियासहीत अनेक प्रकारच्या जीवाणू, विषाणू, बुरशी व अन्य रोगकारक सूक्ष्म जीवांना काही मिनिटांमध्येच नष्ट करू शकते. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे कोटिंग विकसित केले आहे. चाचणीत या कोटिंगने 99.9 टक्के रोगजंतूंना नष्ट केल्याचे दिसून आले.
मिशिगन युनिव्हर्सिटीतील अनीश टुटेजा यांनी सांगितले की अशा कोटिंगचा वापर हॉस्पिटल व विमानतळांसारख्या सार्वजनिक ठिकाणी केला जाणे गरजेचे आहे. रोगजंतूनाशक क्लिनर केवळ एक ते दोन मिनिटातच अशा सूक्ष्म जीवांना नष्ट करते; पण ते लवकर संपून जाते व पृष्ठभागांवर पुन्हा जीवाणू येऊ लागतात.
कॉपर (तांबे) आणि झिंक (जस्त) अशा धातूंपासून बनवलेली आवरणे दीर्घकाळ जीवाणूरोधक म्हणून काम करू शकतात; पण त्यांना विषाणू नष्ट करण्यासाठी अनेक तास लागतात. त्या पार्श्वभूमीवर हे नवे कोटिंग अधिक प्रभावी ठरते. हे दोन मिनिटापेक्षा कमी वेळेत घातक जीवाणू व विषाणूला नष्ट करते. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानेही ते सुरक्षित मानले आहे.