लघुग्रहांच्या धडकेने झाली मंगळावर वाळूची निर्मिती | पुढारी

लघुग्रहांच्या धडकेने झाली मंगळावर वाळूची निर्मिती

ग्लासगो : डोंगर अथवा जमिनीची धूप होऊन पृथ्वीवर वाळूची निर्मिती होते. ही प्रक्रिया अत्यंत संथ आणि सातत्याने सुरूच असते. मात्र, मंगळावरील परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. तेथे पाणी नाही, पण वारे वेगाने वाहतात. मात्र, हाच वारा मंगळावरील वाळूच्या निर्मितीस कारणीभूत आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. या ग्रहासंबंधी करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनानुसार लघुग्रहांच्या धडकेमुळे मंगळावर वाळूची निर्मिती झाली आहे.

परड्यू युनिव्हर्सिटीतील ग्रह शास्त्रज्ञ ब्रियोनी हॉर्गन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या संशोधनानुसार मंगळावर असलेल्या एकूण वाळूच्या एक चतुर्थांश वाळू ही लघुग्रहांच्या धडकेनंतर निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे काचेच्या गोलाकार तुकड्यांमुळे बनली आहे. तसेच प्रचंड वेगाने हवेत उडणार्‍या वाळूने मंगळावर अनेक भू-आकृतींची निर्मिती केली आहे. या सर्व घडामोडींना लघुग्रहांची धडक जबाबदार आहे.

मंगळासंबंधीच्या या संशोधनावर स्कॉटलँडमधील ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या ‘मीटियोरिटिकल सोसायटी’च्या वार्षिक बैठकीत शास्त्रज्ञांनी चर्चा केली. हॉर्गन व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रकाशीय व इन्फ्रारेडच्या वेगवेगळ्या तरंगांचा अभ्यास करून मंगळावरील वाळू निर्मितीसंबंधीचा निष्कर्ष काढला आहे. हे तरंग मंगळाभोवती फिरणार्‍या वेगवेगळ्या उपग्रहांनी आकड्यांच्या रूपात गोळा केले आहेत. आता याच माध्यमातून संशोधक मंगळावर असलेल्या इतर अनेक खनिजांचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.

Back to top button