अंगणात सापडला डायनासोरचा सर्वात मोठा सांगाडा | पुढारी

अंगणात सापडला डायनासोरचा सर्वात मोठा सांगाडा

लिस्बन : पोर्तुगालमध्ये एका माणसाला घराच्या अंगणात खोदकाम करीत असताना डायनासोरची काही हाडे दिसून आली होती. त्यानंतर संशोधकांकडून काळजीपूर्वक करण्यात आलेल्या उत्खननात आता तिथे डायनासोरचा युरोपमधील सर्वात मोठ्या आकाराचा सांगाडा आढळून आला आहे. तब्बल 82 फूट लांबीच्या ब्रॅकियोसॉरस या डायनासोरचा हा सांगाडा आहे. 10 ते 16 कोटी वर्षांपूर्वी हा डायनासोर पृथ्वीवर वावरत होता. हा युरोपमध्ये शोधण्यात आलेला सर्वात मोठा सॉरोपोड असू शकतो.

सॉरोपोड हे शाकाहारी डायनासोर होते. चार पाय, लांबलचक मान आणि लांब शेपटी यासाठी हे अवाढव्य डायनासोर ओळखले जातात. लिस्बन युनिव्हर्सिटीतील एक संशोधिका एलिझाबेथ मुलाफिया यांनी सांगितले की, अशा प्रकारे एखाद्या प्राण्याच्या सर्व फासळ्या एकत्र मिळणे कठीण बाब आहे. विशेष म्हणजे या फासळ्या आपल्या मूळ शारीरिक स्थितीतच आहेत. सॉरोपोडबाबत तर इतक्या सुरक्षितपणे जतन झालेले जीवाश्म सापडणे हे अत्यंत दुर्मीळ आहे. पोम्बल या गावात 2017 मध्ये एका नागरिकास घराच्या अंगणात खोदकाम करीत असताना डायनासोरची काही हाडे दिसून आली होती.

एका सजग नागरिकाचे कर्तव्य बजावत त्याने ही बाब तत्काळ संशोधकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर याठिकाणी संशोधकांच्या एका पथकाने उत्खनन सुरू केले. आता या ठिकाणी 39 फूट उंच व 82 फूट लांबीच्या सॉरोपॉडचा सांगाडा सापडल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. या सांगाड्यात पाठीचा मणका आणि फासळ्यांचा समावेश आहे. हा सॉरोपॉड ब्रॅकियोसॉरस प्रजातीचा होता.

Back to top button