चीन बनवत आहे बंदुकीची हायपरसोनिक गोळी! | पुढारी

चीन बनवत आहे बंदुकीची हायपरसोनिक गोळी!

बीजिंगः चीनमध्ये सध्या ध्वनीपेक्षा पाच पट अधिक वेग असलेली म्हणजेच ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रे व अन्य गोष्टी बनवल्या जात आहेतच, पण आता ‘हायपरसोनिक बुलेट’ म्हणजेच बंदुकीच्या गोळीचाही विकास केला जात आहे. अलीकडेच अशा हायपरसोनिक गोळीची जिवंत प्राण्यावर चाचणीही घेण्यात आली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार चोंगकिंगमध्ये एका आर्मी मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी अलीकडेच 11 मॅकच्या वेगाने डागली जाणारी (फायर होणारी) 5 एमएम स्टील प्रोजेक्टाइलची जिवंत डुकरावर चाचणी घेण्यात आली. ज्यावेळी ही गोळी फायर करण्यात आली त्यावेळी हे डुक्कर बेशुद्ध होते.

मानवावर या गोळीचा कसा परिणाम होईल हे पाहण्यासाठी जिवंत प्राण्यावर म्हणजेच एका डुकरावर ही गोळी झाडण्यात आली. 11 मॅकचा वेग म्हणजेच ध्वनीपेक्षा 11 पट अधिक वेग. चायना ऑर्डनन्स सोसायटीच्या एक्टा आर्ममेंटरी पीयर-रिव्ह्यू जर्नलमधील एका पेपरच्या आधारे साऊथ मॉर्निंग पोस्टने हे वृत्त दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की डुकराच्या जांघेवर ही गोळी झाडण्यात आली. यामुळे डुकराचा तत्काळ मृत्यू झाला नाही. मात्र ते गंभीररीत्या जखमी झाले.

हाडांमध्ये फ्रॅक्चर, आतडे, फुफ्फुस, मुत्राशय आणि मेंदूत रक्तस्राव दिसून आला. जांघेत गोळी 1 ते 3 किलोमीटर प्रतिसेकंदच्या वेगाने घुसते. मात्र ज्यावेळी हा वेग 4 किलोमीटर प्रतिसेकंद होतो त्यावेळी गोळीच्या ‘एंट्री पॉईंट’वर मोठा घाव निर्माण होतो. सामान्य गोळ्या 1.2 किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने जातात.

Back to top button